गजेंद्र चौहानांविरोधात निदर्शने करणा-या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीमार
By admin | Published: January 7, 2016 11:22 AM2016-01-07T11:22:32+5:302016-01-07T11:23:56+5:30
एफटीआयआयचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या आगमनापूर्वी पुन्हा आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला तसेच काहींना ताब्यातही घेतले.
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ७ - फिल्म अँड टेलिव्हिज इन्स्टिट्यूटच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या विरोधात चार महिने संप करणा-या विद्यार्थ्यांनी आज चौहान यांच्या आगमनापूर्वी पुन्हा आंदोलन केल्याने एफटीआयआयच्या परिसरातील वातावरण तापले. 'गजेंद्र चौहान हाय हाय', ' गजेंद्र चौहान वापस जाओ' अशा घोषणांनी एफटीआयआयचा परिसर दणाणून गेला होता. आक्रमक विद्यार्थ्यांना थोपवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला तसेच काही विद्यार्थ्यांना ताब्यातही घेतले.
चार महिने चाललेले आंदोलन, संप यानंतरही अभिनेते व भाजपा कार्यकर्ते गजेंद्र चौहान आज पुण्यातील एफटीआयआयचे अध्यक्षपद स्वीकारणार असून आज पहिल्यांदाच ते पहिल्यादांच ते एफटीआयआयमध्ये दाखल होतील. मात्र त्यांना विरोध दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुन्हा निदर्शनाचे शस्त्र हाती घेतले असून आज सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी एफटीआयआयच्या परिसरात चौहान यांच्याविरोधात घोषणा दिल्या तसेच मोर्चाही काढला. पोलिसांनी काल काही विद्यार्थ्यांना नोटीसही बजावली होती, मात्र तरीही आज विद्यार्थी रस्त्यावर उतरलेच.
गजेंद्र चौहान यांनाअध्यक्षपदी नियुक्त करुन केंद्र सरकार संस्थेत हस्तक्षेप करत असून त्यांची निवड करताना अनेक पात्र व्यक्तींना डावलंल गेलं, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी तब्बल १३९ दिवस संपही केला होता.