स्वारगेट प्रकरणातील वकिलाच्या सहाय्यकाचे अपहरण; नेमके काय घडले?
By नम्रता फडणीस | Updated: March 18, 2025 18:23 IST2025-03-18T18:17:28+5:302025-03-18T18:23:43+5:30
या वकिलानेनंतर हडपसर पोलिस स्टेशन गाठत मारहाण झाल्याची तक्रार दिली.

स्वारगेट प्रकरणातील वकिलाच्या सहाय्यकाचे अपहरण; नेमके काय घडले?
पुणे - स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरूणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने राज्यात खळबळ उडवून दिली होती. आता याच प्रकरणातील दत्तात्रय गाडे यांच्या एका वकिलाकडे काम करणा-या सहाय्यक वकिलाचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
साहिल डोंगरे असे मारहाण झालेल्या सहाय्यक वकिलाचे नाव आहे. दत्तात्रय गाडे याचे वकील वाजिद खान बिडकर यांच्याकडे अँड डोंगरे हे सहाय्य्क वकील म्हणून काम करतात. त्यांच्या सहाय्यक वकिलावर हल्ला झाल्याच्या प्रकाराला वाजिद खान बिडकर यांनीही दुजोरा दिला आहे. वाजिद खान बिडकर यांनी साहिल डोंगरे यांचा एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात डोंगरे सांगत आहेत की रात्री दहा ते साडे दहाच्या सुमारास एका केस संदर्भात मी हडपसर पोलीस स्टेशन येथे गेलो होतो. एक क्लाईंट मला भेटून् गेला आणि त्याने मला 54 हजार् रुपये दिले होते. मला सारखे वाटत होते की कुणीतरी माझा पाठलाग करीत आहे.
मी तिथून पेट्रोल संपले म्हणून पाऊण ते एक च्या सुमारास पेट्रोल पंपावर गेलो होतो. रस्त्याच्या कडेला मला कुणीतरी मदत् मागितली तिथे गेलो. अचानक् मागून एक गाडी आली. मला गाडीत घातले आणि डोळे उघडले. तेव्हा मारहाण करून दिवे घाटात सोडून देण्यात आले. मी स्वत: कसा आलो हे माझे मला माहिती आहे,. मारहाण झाल्यानंतर मी स्वत: जखमी अवस्थेत हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे.
स्वारगेटची घटना काय होती?
पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर फलटणला निघालेल्या तरुणीला चुकीच्या शिवशाही बसमध्ये नेऊन आरोपीनं तिच्यावर एकदा नव्हे तर दोनदा अत्याचार केला. २८ फेब्रुवारी रोजी पहाटे दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून त्याला अटक केली. त्यानंतर न्यायालयानं आरोपीला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात गाडे याचे वकील पत्र अँड वाजिद खान-बिडकर, अँड साजिद शाह आणि अँड सुमित पोटे यांनी घेतले आहे. आरोपीच्या माहितीवरून गाडे चे वकील अँड सुमित पोटे यांनी पीडितेला आरोपीने ७५०० रुपये दिल्याचे वादग्रस्त विधान करून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अँड पोटे यांनी न्यायालयात असा कोणताही युक्तिवाद केला नव्हता. केवळ आरोपीच्या माहितीवरून सांगितल्याचे स्पष्ट करीत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.