पोलिसांनाच बनावट ई-चलानचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 02:26 AM2017-11-10T02:26:22+5:302017-11-10T02:26:29+5:30
ई-चलानद्वारे वाहतूक पोलीस पाठवत असलेल्या मेसेजसारखेच बनावट मेसेज तयार करून दंड भरला असल्याचे भासवत
पुणे : ई-चलानद्वारे वाहतूक पोलीस पाठवत असलेल्या मेसेजसारखेच बनावट मेसेज तयार करून दंड भरला असल्याचे भासवत पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकून शासनासह वाहतूक विभागाला गंडा घालणारा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. तब्बल ३९९ बनावट मेसेज तयार करून ते ३९ व्यक्तींना पाठवत ८१ हजार २१२ रुपयांची फसवणूक त्याने केल्याचे समोर आले आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान हा प्रकार सुरू होता.
असिफ अरीफ शेख (रा. झांबरे पॅलेस महर्षीनगर कोंढवा) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेव्हन लव्हज चौकात स्वारगेट वाहतूक पोलीस वाहनांची तपासणी करीत असताना असिफ शेखने त्याच्या मोबाईलवरील मेसेज दाखवून अगोदरच दंड भरल्याचे सांगितले. पोलिसांना या मेसेजचा संशय आला. त्यांनी तो बारकाईने पाहिला असता बनावट असल्याचे दिसून आले. मोबाईल तपासला असता स्वत:च्या मोबाईलवर पुणे पोलीस ई चलानद्वारे जसे मेसेज पाठवितात त्यासारखेच दंड भरल्याचे बनावट मेसेज मोबाईलच्या मेसेज इनबॉक्समध्ये त्याने ३९ लोकांना पाठवल्याचे आढळले. बनावट मेसेज असूनही वाहतूक पोलिसांनी केलेल्या दंडात्मक कारवाईचेच हे मेसेज असल्याचे भासवत पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक शाखा परिमंडळ २चे सहायक पोलीस निरीक्षक देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर, पोलीस शिपाई जगताप आणि पोलीस शिपाई कोंडे यांनी कारवाई केली.