नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारा तोतया पोलीस अधिकारी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:08 AM2020-12-23T04:08:43+5:302020-12-23T04:08:43+5:30
सुरेश ईश्वर पेंडणेकर (वय ३६, रा. भांडुप, मुंबई) असे या तोतयाचे नाव आहे. याप्रकरणी जया राजू पंडित (वय ४२, ...
सुरेश ईश्वर पेंडणेकर (वय ३६, रा. भांडुप, मुंबई) असे या तोतयाचे नाव आहे. याप्रकरणी जया राजू पंडित (वय ४२, रा. मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, सुरेश पेंडणेकर याने फिर्यादी यांना दीड वर्षापूर्वी आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यांच्या मुलाला पोलीस दलात नोकरी लावतो, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी ८० हजार रुपये घेतले. तरीही त्याला नोकरी लावली नाही. तेव्हा फिर्यादी यांनी पैसे परत मागण्यास सुरुवात केल्यावर त्याने फिर्यादीच्या खात्यात १२ हजार रुपये परत केले. मात्र, उरलेले ६८ हजार रुपये परत देण्यास टाळाटाळ केली. तेव्हा त्यांनी समर्थ पोलिसांकडे फिर्यादी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु तान्हाणे यांच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. पेंडणेकर हा जुन्या जिल्हा परिषदेजवळील संजीवनी हॉटेलजवळ असल्याची माहिती मिळाल्यावर सोमवारी सायंकाळी त्याला पोलिसांनी पकडले. सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे अधिक तपास करीत आहेत.