पोलिसांच्या बदल्यांचा धडाका सुरूच! पिंपरी-चिंचवडच्या दोन उपायुक्तांसह एका सहाय्यक आयुक्ताची बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 11:50 AM2020-10-10T11:50:22+5:302020-10-10T11:51:26+5:30
पोलीस उपायुक्त तसेच सहायक पोलीस आयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य गृह विभागाकडून शुक्रवारी काढण्यात आले.
पिंपरी : राज्याच्या गृह विभागाकडून शुक्रवारी पोलीस उपायुक्त तसेच सहायक पोलीस आयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. यात पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील दोन उपायुक्त व एका सहायक आयुक्ताची बदली झाली. तसेच नव्याने एक उपायुक्त व तीन सहायक आयुक्त नियुक्त करण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवडसाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. तोकड्या मनुष्यबळावर आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले. पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण आहे. त्यामुळे मंजूर मनुष्यबळानुसार अधिकारी व कर्मचारी मिळावेत म्हणून आयुक्तालयाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यानुसार आयुक्तालयाला नव्याने तीन सहायक पोलीस आयुक्त मिळाले आहेत. त्यामुळे सहायक आयुक्त सात झाले आहेत. नव्याने दोन उपायुक्त आले असले तरी दोन उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त स्मिता पाटील तसेच विनायक ढाकणे यांची बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या नवीन नियुक्तीबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत. हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस बल गट १२ चे समादेशक मंचक इप्पर यांची पिंपरी-चिंचवडच्या परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्तपदी बदली झाली आहे. यापूर्वी आनंद भोईटे यांची परिमंडळ दोनच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
नागपूर येथील सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे व गणेश बिरादार तसेच डॉ. सागर कवडे यांची पिंपरी-चिंचवड शहर दलात सहायक आयुक्तपदी बदली झाली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहर दलातील वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांची नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील उपविभागीय अधिकारीपदी बदली झाली आहे.
रामचंद्र जाधव यांची बदली रद्द
चाकण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांची ३० सप्टेंबरच्या आदेशानुसार जालना येथे बदली करण्यात आली होती. मात्र जाधव यांनी ‘मॅट’कडे धाव घेतली. त्यानंतर त्यांची बदली रद्द करण्यात आली आहे. जाधव यांनी चाकण विभागाचा पदभार पुन्हा स्वीकारला आहे.