पोलीस हाच समाजाचा आधार - गिरीश बापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 03:40 AM2017-12-02T03:40:58+5:302017-12-02T03:41:05+5:30
प्रत्येक गरीब, पीडित माणसाला आधाराची गरज आहे. त्याला कोणीतरी वाली हवा आहे. पोलीस हे समाजाला अनेक संकटांतून बाहेर काढू शकतात आणि तेच या समाजाचे आधार आहेत, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
पुणे : प्रत्येक गरीब, पीडित माणसाला आधाराची गरज आहे. त्याला कोणीतरी वाली हवा आहे. पोलीस हे समाजाला अनेक संकटांतून बाहेर काढू शकतात आणि तेच या समाजाचे आधार आहेत, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
बालगंधर्व रंगमंदिर येथे लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तजयंतीनिमित्त गुरुमहात्म्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टचे विश्वस्त विकास वालावलकर, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रणजित जगताप यांचा रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या वेळी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट अध्यक्ष अशोक गोडसे, अंकुश काकडे, कार्यकारी विश्वस्त शिवराज कदम जहागीरदार आदी उपस्थित होते. बापट म्हणाले, आपल्याकडे अनेक डॉक्टर एमबीबीएसची पदवी घेतात, पण ती घेऊन ग्रामीण भागात जात नाहीत ही एक मानसिकता निर्माण झाली आहे. ती आता कमी होणे गरजेचे आहे.
शिवकुमार डिगे म्हणाले, की अनेक मंडळांनी या ट्रस्टप्रमाणे सामाजिक कामे केली पाहिजे. मंडळांनी केवळ गणेशोत्सव साजरा न करता रस्त्यावरील खड्डे बुजवणे, आपल्या वर्गणीतील १० टक्के रक्कम गरीब कुटुंबांसाठी खर्च करणे या गोष्टी करायला पाहिजेत. धर्मादाय रुग्णालयाचे दरवाजे गरीब लोकांसाठी नेहमी उघडे आहेत. गरिबांसाठी रुग्णालयाने अनेक योजना राबविल्या आहेत.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, की माझे अर्धे शिक्षण सातारा आणि बाकीचे पुण्यात झाले. त्यामधून मला जो फरक जाणवला तो म्हणजे पुण्यात शिक्षणाची अथवा वैद्यकीय सेवा उत्तम आहे. या तिघांना या ट्रस्टने पुरस्कार देऊन सन्मानित केले याचे मला कौतुक वाटते. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले.
विश्रांती घेतली की गंज...
कोणत्याही कामात विश्रांती घेतली, की आपल्याला गंज लागायला सुरुवात होते. त्यामुळे सतत कार्यरत राहून वेळप्रसंगी कठोर, मृदु व्हायला हवे. दुसºयाला आपल्या ताटातील घास देणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे थोर पुरुषांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करायला हवेत.
- विश्वास नांगरे- पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक