Pune: शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी टणूचे पोलिस पाटील निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 10:17 AM2024-01-01T10:17:40+5:302024-01-01T10:18:25+5:30
टणू येथील पोलिस पाटील शरद श्रीधर जगदाळे यांना तीन अपत्ये असल्याने निलंबित करण्यात आल्याचा महत्त्वपूर्ण निकाल उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर बारामती यांनी दिला आहे...
नीरा नरसिंहपूर (पुणे) : टणू गावचे पोलिस पाटील शरद जगदाळे यांनी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर बारामती यांच्या आदेशावरून शरद जगदाळे यांना पोलिस पाटील पदावरून निलंबित करण्यात आले.
टणू येथील पोलिस पाटील शरद श्रीधर जगदाळे यांना तीन अपत्ये असल्याने निलंबित करण्यात आल्याचा महत्त्वपूर्ण निकाल उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर बारामती यांनी दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमनाथ चंद्रकांत मोहिते (रा. टण्णू, ता. इंदापूर) यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, बारामती यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. टणू गावच्या पोलिस पाटीलपदी नियुक्ती होऊन त्यांनी अपत्य कायदा २००५ चे उल्लघंन करून शासनास खोटी कागदपत्रे सादर केली व शासनाची फसवणूक केली आहे. पोलिस पाटील शरद जगदाळे यांची २००९ साली नियुक्ती झाली आहे व त्यांना २००५ पूर्वी दोन व २००७ नंतर १, अशी तीन अपत्ये आहेत. त्यांना ३ अपत्ये असून, शरद जगदाळे यांनी शासनाची फसवणूक केली आहे. शरद जगदाळे यांची पोलिस पाटील म्हणून झालेली नियुक्ती रद्द करण्यात आली. तक्रारीची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर (बारामती) यांच्या सूचनेनुसार इंदापूर तहसीलदारांमार्फत सखोल चौकशी केली असता पोलिस पाटील शरद जगदाळे टणू यांना तीन अपत्ये आहेत, हे सिद्ध झाले असल्याचे दिसून आले.
निकालानंतर तक्रारदार सोमनाथ मोहिते यांनी सत्याचा विजय झाला, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, हे सिद्ध झाले, अशी प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त केले.