ग्रामसभेत ‘पोलीस पाटील’ हटाव मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 09:21 PM2018-08-21T21:21:07+5:302018-08-21T21:22:28+5:30
ग्रामस्थांनी आम्हाला सध्याचे पोलीस पाटील नको आहेत. यासाठी मतदान घेण्याची मागणीही केली. ही मागणी मान्य करून ‘गुप्त’ पध्दतीने मतदान घेण्यात आले.
पळसदेव : भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ग्रामसभा मंगळवारी पार पडली. मात्र, ही ग्रामसभा वादळी ठरली. गावचे पोलीस पाटील बदलण्याचा ठराव करावा या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यातच ग्रामविकास अधिकारी यांनी तसा ठराव ग्रामसभेत करता येत नाही असे सांगितल्याने ग्रामस्थांचा पारा चढला.पोलीस पाटील बदलाचा ठराव करता येत नसल्याचे लेखी द्या, कोण म्हणते ठराव करता येत नाही, आम्ही पुरावे सादर करतो असे म्हणत ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी दिपक भोसले यांना धारेवर धरले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला. यावेळी ग्रामस्थांनी आम्हाला सध्याचे पोलीस पाटील नको आहेत. यासाठी मतदान घेण्याची मागणीही केली. ही मागणी मान्य करून ‘गुप्त’ पध्दतीने मतदान घेण्यात आले. ग्रामसभेला ११९ ग्रामस्थ उपस्थित होते. त्यापैकी ८२ ग्रामस्थांनी मतदान केले. पोलीस पाटलांच्या विरोधात ८० तर त्यांच्या बाजुने २ मते पडली. त्यामुळे या ग्रामसभेत जणू काही पोलीस पाटील ‘हटाव’ ची मोहिमच राबविण्यात आली.
ग्रामसभेत सुरवातीला ‘प्रोसडींग’ वाचन झाले. त्यानंतर इतर विषय ही सवार्नुमते मंजूर करण्यात आले. मात्र, ऐनवेळीच्या विषयात चर्चा झाली तेव्हा आलेल्या अर्जाचे वाचन करण्यात आले. त्याअंतर्गत योगेश कदम, हनुमंत भंडलकर, काकासाहेब कनेहरकर यांनी पोलीस पाटील बदलण्याची मागणीचा अर्ज ग्रामविकास अधिकारी यांना दिला होता. त्यानुसार गुप्त मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी दोन वाजता ग्रामविकास अधिकारी भोसले यांनी मतमोजणी केली. भिगवण पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. या ग्रामसभेला सरपंच राणी कनेहरकर, उपसरपंच विजय राक्षे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
...............
पोलीस पाटील हटवा यासाठी मतदान होण्याची बहुधा पुणे जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. पोलीस पाटील हा गावामध्ये एकोपा राहावा, गावात भांडणे होऊ नये, यासाठी काम करत असतात.
४येथील पोलीस पाटील यांच्या विरोधात गाव एकवटून मतदान घेतो
ही खेदाची बाब आहे. मात्र, ग्रामस्थांच्या रोषाचे कारण शोधण्याची आवश्यकता आहे.