मावळात पोलीस पाटलांचे ‘जागते रहो’: रात्र गस्तीसाठी पोलिसांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 06:03 PM2020-05-13T18:03:00+5:302020-05-13T18:03:12+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नोंद, तपासणीच्या सुचना तसेच गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी उपक्रम
वडगाव मावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नोंद घेणे, त्यांना तपासणीच्या सुचना देणे,तसेच गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गावोगावचे पोलीस पाटील रात्रीची गस्त घालणार आहेत. त्यात महिलांचाही समावेश राहणार आहे. दुचाकी चोरी, घरघोडी, लुटमार अशा वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. वडगाव मावळपोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या ४८ गावांमध्ये पोलिसांची संख्या कमी आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या भूमिकेत पोलिस मित्र, ग्रामसुरक्षा दल, पोलिस पाटीलही रात्रीची गस्त घालणार आहेत.
पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सांगितले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे इतर भागातील नागरीक मोठ्या प्रमाणावर येतात. ज्या गावात येतील त्या गावातील पोलिस पाटलांनी त्यांची नोंद घेऊन आरोग्य खात्यामार्फत तपासणी करण्यासाठी त्यांना पाठवायचे. तसेच गावात कोण येतय कोण जातय यावर लक्ष ठेवायचे. अशा सुचना देण्यात आल्या.
पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून ही गस्त सुरू करण्यात घोषणा केल्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी पोलिस पाटलांची बैठक घेऊन सुरवात वडगाव मावळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून गस्तीचे कामही सुरू झाले आहे. वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडगाव, कान्हे, आंदरमावळ, टाकवे, जांभुळ यासह ४८ गावांचा समावेश आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण वडगाव असल्याने विविध पक्षांचे मोर्चे, बंदोबस्त व इतर कामांचा सतत लोड असतो. ४८ गावे असुनही तीन अधिकारी व फक्त ३७ पोलिस कार्यरत आहेत.त्यात चो-या, घरफोड्या विविध गुन्हे घडत असल्याने पोलिसांवर कामाचा ताणतणाव येऊ लागला आहे. त्यांचा ताण कमी करण्यासाठी पोलिस पाटलांनीही गस्तीसाठी तयारी दाखवून सहभागी झाले. गस्तीदरम्यान संशयित आढळल्यास पोलिसांना कळवावे. जबरी चोरी असे प्रकार आपल्या गावात घडू नये याची काळजी घ्यावी., अशा विविध सुचना पोलिस पाटलांना देण्यात आल्या.