हिंदू जनगर्जना मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंचरमध्ये पोलिसांचे पथसंचलन; शांतता राखण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 12:31 PM2023-06-24T12:31:27+5:302023-06-24T12:33:02+5:30
दुपारी होणाऱ्या हिंदू जनगर्जना मोर्चाच्या अनुषंगाने सकाळी पोलिसांनी मंचर शहरातून पथसंचलन केले...
मंचर (पुणे) : शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारी होणाऱ्या हिंदू जनगर्जना मोर्चाच्या अनुषंगाने सकाळी पोलिसांनीमंचर शहरातून पथसंचलन केले. लव जिहाद, गोहत्या, धर्मांतर याकडे लक्ष वेधण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मंचर शहरासह परिसरातील गावांमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
मंचर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. या बंदला पाठिंबा देत तालुक्यातील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारतळ, श्रीराम मंदिर, अवलिया दर्गा, छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे पोलिसांनी सकाळी पथसंचलन केले.
पथसंंचालनाच्या वेळी 2 पोलीस उपअधीक्षक, 4 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक 6 पोलीस उपनिरीक्षक, 60 पोलिस अंमलदार, 10 महिला अंमलदार, 50 होमगार्ड, 1 आरसीपी पथक जुन्नर, 1 एस आर पी एफ कंपनी यांनी सहभाग घेतला. सकाळी 10 ते 11 या दरम्यान पथसंचलन करण्यात आले.
दुपारी होणाऱ्या मोर्चाचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार असून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ड्रोन कॅमेऱ्याने सर्व मोर्चावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व वाहनांचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याने सर्व नागरिकांनी शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी केले आहे.