पोलिसांच्या तत्परतेने आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे वाचविले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 07:01 PM2020-06-22T19:01:54+5:302020-06-22T19:02:26+5:30
लॉकडाऊनमध्ये देणेकरांशी खोटे बोलता येत नसल्याने झाला होता निराश
पुणे : शहरात आत्महत्येचे सत्र सुरु असता असताना पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेने आणखी एक आत्महत्येचा प्रकार टळला. आत्महत्येचा प्रयत्न करीत असलेल्या तरुणाला मार्केटयार्ड पोलिसांनी वाचविले. जुन्या वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारा हा तरुण लॉकडाऊनमुळे कर्जात बुडाला होता. पैसे देणार्यांचे दररोज फोन येत होते. पण त्यांना तो खोटी आश्वासने देऊ शकत नव्हता. त्यामुळे तो आत्महत्या करायला चालला होता.
पोलीस नियंत्रण कक्षाला रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक फोन आला. त्याने मार्केटयार्ड येथील हाईड पार्क येथे राहणारा त्याचा मित्र आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. या माहितीवरुन मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील बीट मार्शल मकसुद तांबोळी आणि उत्तम शिंदे यांनी तातडीने त्याचे घर शोधून काढले व फ्लॅटचा दरवाजा वाजवून उघडण्याची विनंती केली. त्यावेळी आतील तरुणाने सुरुवातीला दरवाजा उघडण्यास नकार दिला. साहेब तुम्ही कृपा करुन निघून जावा, मी आज खूप टेंशनमध्ये असून मला आज आत्महत्या करायची आहे, असे मी मित्रांनाही फोनद्वारे कळविले आहे. पोलिसांनी त्याला विनवणी करत समजावून सांगितले. त्यानंतर त्याने दरवाजा उघडला. त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर, सहायक पोलीस निरीक्षक खटके, उपनिरीक्षक भोसले यांनी त्याला समजावून सांगितले. त्याच्या भावाला बोलावून घेतले.
कोरोनामुळे व्यवसाय बंद झाला आहे. काही व्यवहार अडकले असून त्यामुळे कर्ज झाले आहे. पैसे देणे असल्याने दररोज फोन येत होते. देणेकऱ्यांना खोटे बोलता येत नव्हते. गेले दोन ते तीन दिवस घरात एकटाच होतो. आत्महत्या केल्यानंतर बाकीची काहीही कटकट राहणार नाही, असे वाटल्यामुळे आत्महत्येचा पर्याय निवडला.
पोलिसांनी त्याला समजावून सांगितले. ज्यांचे पैसे तो देणे होता, त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. तसेच त्यांना पैशासाठी फोन न करण्यास सांगितले़ व व्यवसाय पुन्हा जोमाने सुरु करुन पैसे देण्यास सांगितले. पोलिसांच्या सहकार्यामुळे या तरुणाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले व त्याने पुन्हा नव्याने व्यवसाय जोमात सुरु करण्याचे पोलिसांना आश्वासन दिले.