लोणावळ्यातील लादेन टोळीविरोधात पोलिसांचा तडीपारीचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 09:08 AM2018-01-20T09:08:41+5:302018-01-20T09:14:44+5:30
लोणावळा शहरात खंडणी, हाणामारी, अवैध धंदे अशा पद्धतीनं धुमाकूळ घालत असलेल्या लोणावळ्यातील लादेन टोळीच्या मुसक्या आवळण्याची तयारी लोणावळा शहर पोलिसांनी सुरु केली असून त्यादृष्टीने पुरावे गोळा करत कलम 55 प्रमाणे तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे लोणावळा शहर पोलिसांनी सांगितले.
लोणावळा - लोणावळा शहरात खंडणी, हाणामारी, अवैध धंदे अशा पद्धतीनं धुमाकूळ घालत असलेल्या लोणावळ्यातील लादेन टोळीच्या मुसक्या आवळण्याची तयारी लोणावळा शहर पोलिसांनी सुरु केली असून त्यादृष्टीने पुरावे गोळा करत कलम 55 प्रमाणे तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे लोणावळा शहर पोलिसांनी सांगितले.
२०१५ साली लोणावळा शहरात भरदिवसा शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या जयचंद चौकात "लादेन" टोळीतील गुंडांनी धारदार चाकूने वार करून आनंद शिंगाडे या युवकाची हत्या केली होती, या गुन्ह्यातील सर्व साक्षीदार फितूर झाल्यामुळे या केसमधून लादेन टोळीचे सर्व आरोपी निर्दोष सुटून पुन्हा लोणावळ्यात आले. जेलमधून बाहेर सुटलेले आरोपी हे गप्प बसणार नाहीत, याबद्दल पोलिसांना खात्री होती, त्यामुळे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी या टोळीतील गुन्हेगाराची दहशत मोडून काढणेसाठी त्याचे विरुद्धच्या सर्व पुरावा गोळा करून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- ५५ प्रमाणे प्रस्ताव तयार केला पण या प्रस्तावा साठी नागरिकांचे सुद्धा गोपनीय जबाब लागतात यासाठी जाधव यांनी लोणावळा शहरातील व्यापारी, सामाजिक कार्य करणारे लोक यांना पुढे होऊन जबाब देण्यासाठी आवाहन केले परंतु कोणीही पुढे आले नाही यावरून लोकांची मानसिकता दिसून येते.
जनतेच्या पोलीस खात्याकडून खूप अपेक्षा असतात, पण वेळ आल्यावर लोक योग्य मदतीसाठी पुढे येत नाहीत अशी खंत पोलीस प्रशासनाने व्यक्त केली. असे असले तरी शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता लोणावळा पोलिसांनी या गुन्हेगार टोळीच्या मुसक्या अावळण्यासाठी तयारी केली आहे. ही टोळी कारागृहात होती त्यावेळी लोणावळा शहरात शांतता नांदत होती मात्र मागील काही दिवसांपासून शहरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवडाभरात या टोळीने शिवसेनेच्या नगरसेविका शादान चौधरी, उद्योजक प्रकाश हजारे यांच्यासह अन्य दोन व्यावसायकांकडे खंडणीची मागणी करत त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. याप्रकरणी चौधरी व हजारे यांच्या तक्रारीवरुन लादेन टोळीवर खंडणीचे दोन गुन्हे दाखल करत दोन जणांना अटक करण्यात आली असून याप्रकरणातील मुख्य तीन जण अद्याप फरार आहेत.