सामाजिक कार्यकर्ते अॅड असीम सरोदे यांना पोलीस संरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 04:54 PM2018-11-05T16:54:12+5:302018-11-05T16:57:40+5:30
पोलीस सुरक्षा समितीची नुकतीच बैठक झाली़ त्यात अॅड असीम सरोदे यांच्या जीवाला असलेल्या धोकाबाबत गुप्तवार्ता विभागाकडून काही इनपुट आले होते. त्याची दखल घेऊन पोलिसांकडून अॅड सरोदे यांना पोलीस सरंक्षण पुरविण्यात आले आहे.
पुणे : वाढता सामाजिक तणाव व लढवत असलेल्या महत्वाच्या खटल्यांमध्ये होत असलेला विरोध लक्षात घेऊन पुणेपोलिसांकडून मानवाधिकार कार्यकर्ते अॅड असीम सरोदे यांना पोलीस सरंक्षण पुरविण्यात आले आहे.
पोलीस सुरक्षा समितीची नुकतीच बैठक झाली़ त्यात अॅड असीम सरोदे यांच्या जीवाला असलेल्या धोकाबाबत गुप्तवार्ता विभागाकडून काही इनपुट आले होते. त्याची दखल घेऊन पोलिसांकडून अॅड सरोदे यांना पोलीस सरंक्षण पुरविण्यात आले आहे. सुमारे चार महिन्यांपासून त्यांना धोका असल्याचे गुप्तवार्ताकडून इशारा दिला जात होता. याबाबत अॅड असीम सरोदे यांनी सांगितले की गेल्या महिन्यात आपल्याला डेक्कन पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यांनी आपला जबाब घेतला. त्यात आपण कोणकोणते खटले लढवत असल्याची माहिती घेतली होती़. त्यानंतर अचानक शनिवारपासून आपल्याला एक हत्यारबंद पोलीस सरंक्षण देण्यात आले. याबाबत पोलिसांना विचारल्यावर त्यांनी सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे त्याची माहिती देता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
याबाबत विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोरोळे यांनी सांगितले की, पुणे शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ४८ जणांना वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार पोलीस सरंक्षण दिले आहे. दर दोन महिन्यांनी सुरक्षा समितीची बैठक होते़ त्यात आढावा घेण्यात येताे. त्यातील सूचनांनुसार अॅड असीम सरोदे यांना पोलीस सरंक्षण देण्यात आले आहे. जसे इनपुट मिळतात त्याआधारे पोलीस काळजी घेत असतात. हा विषय व्यक्तीच्या सुरक्षेचा व जीवाचा प्रश्न असल्याने त्याची माहिती उघड करता येत नाही.
अॅड असीम सरोदे हे मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ते सध्या माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध अंजली दमानिया यांनी दाखल केलेल्या खटल्याचे काम पाहत आहेत. याशिवाय गोव्यातील खाणीविषयीच्या राष्ट्रीय हरीत प्राधिकरणापुढे खटले सुरु आहेत. त्यात अनेक बड्या उद्योगपतींच्या खाणींचा समावेश आहे. मात्र, आपला एल्गार परिषद किंवा त्याच्याशी कोणाशीही संबंध नसल्याचे अॅड सरोदे यांनी सांगितले.