प्रसिद्ध ‘हॉटेल प्यासा’वर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:10 AM2021-03-05T04:10:14+5:302021-03-05T04:10:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील मंडई परिसरातील प्रसिद्ध हॉटेल प्यासावर पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या पथकाने बुधवारी रात्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील मंडई परिसरातील प्रसिद्ध हॉटेल प्यासावर पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या पथकाने बुधवारी रात्री छापा घालून अवैध मद्यविक्री आणि हुक्का पार्लर चालविण्याबद्दल कारवाई केली.
याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन खडक पोलिसांनी प्यासा हॉटेलचे मॅनेजर मनोज शेट्टी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील काही मोजक्या हॉटेल तसेच अन्य व्यावसायिकांवर शहर पोलीस दलाची कायम कृपादृष्टी असल्याचे बोलले जाते. त्यात मंडईमधील हॉटेल प्यासाचा समावेश केला जात होता. शहरात काहीही घडले तरी या हॉटेलवर कधी कारवाई होणार नाही, अशी हॉटेल प्यासाची ख्याती आहे. आजवर या हॉटेलवर कधी कारवाई झाली नसल्याचे सांगितले जाते. हे हॉटेल उशिरापर्यंत सुरू असले तरी त्यावर कधी कारवाई केली जात नसल्याचे बोलले जात होते.
पोलिसांनी गुंड, संघटित टोळ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरु केली आहे. त्यातूनच हा छापा टाकण्यात आल्याचे सांगितले जाते. पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या पथकाने बुधवारी रात्री सव्वा दहा वाजता हॉटेल प्यासावर छापा टाकला. त्यात हॉटेलचा मॅनेजर मनोज शेट्टी याने अवैधपणे हुक्का पार्लर चालवून व बारव्यतिरिक्त रोडलगत मद्यविक्रीकरिता वेगळे काऊंटर बनवून तेथे विनापरवाना अनधिकृतपणे मद्यविक्री करीत असताना मिळून आला. पोलिसांनी या हॉटेलमधून १ लाख १० हजार ६३० रुपयांचे विदेशी मद्य, रोख ६ हजार ७२० रुपये व १९१० रुपयांची हुक्क्याची साधने असा १ लाख १९ हजार २५० रुपयांचा माल जप्त केला आहे.