पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांचा छापा, सात बांगलादेशी महिलांना अटक
By नम्रता फडणीस | Published: October 10, 2023 06:37 PM2023-10-10T18:37:54+5:302023-10-10T18:46:32+5:30
याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
पुणे : सात बांगलादेशी महिलांना बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील बुधवार पेठेमध्ये काही बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने छापा टाकून सात बांगलादेशी महिलांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या महिला गेल्या चार वर्षांपासून पुण्यात बेकायदा वास्तव्य करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडे वास्तव्याबाबतची कागदपत्रे आढळून आली नाहीत. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस हवालदार इरफान पठाण यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, महिलांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीड महिन्यांपूर्वी सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवार पेठ परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलांना पकडले होते. बांगलादेशातील महिला बुधवार पेठ भागातील वेश्यावस्तीत वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती.
गेल्या दोन महिन्यांत बुधवार पेठ परिसरातून २० बांगलादेशी महिलांना बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, तुषार भिवरकर, अजय राणे, इरफान पठाण, अमेय रसाळ, हनुमंत कांबळे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार, रेश्मा कंक आदींनी ही कारवाई केली.