पिंपरीत 'थर्टी फस्ट' चौकाचौकांत पोलिसांचा फाैजफाटा; धांगडधिंगा करणाऱ्यांवर फिरत्या पथकांचा ‘वाॅच’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 20:40 IST2021-12-30T20:39:59+5:302021-12-30T20:40:46+5:30
नववर्ष स्वागतासाठी शहरवासीयांकडून जल्लोष केला असून काही जण मद्यपान करून धांगडधिंगा करत वाहने फिरवतात

पिंपरीत 'थर्टी फस्ट' चौकाचौकांत पोलिसांचा फाैजफाटा; धांगडधिंगा करणाऱ्यांवर फिरत्या पथकांचा ‘वाॅच’
पिंपरी : नववर्ष स्वागतासाठी शहरवासीयांकडून जल्लोष केला जातो. यात काही जण मद्यपान करून धांगडधिंगा करत वाहने फिरवतात. हे प्रकार रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरातील मुख्य चौक तसेच अंतर्गत भागात पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी (दि. ३१) दुपारी चार ते रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तसेच फिरत्या पथकांचा ‘वाॅच’ राहणार आहे.
कोरोना तसेच ओमायक्राॅनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे. सरत्या वर्षाला निरोप देतानाच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरवासीयांकडून मोठा जल्लोष केला जातो. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मद्यपान करून वाहने दामटण्याचे प्रकार हाेतात. त्यासाठी शहरात ठिकिठिकाणी बॅरिकेड्स लावून नाकाबंदी करण्यात येणार आहे. संशयित वाहन व चालकांची तपासणी करण्यात येणार आहे.
फिरस्त्यांना ब्लॅंकेटची ‘उब’
थर्टी फस्ट निमित्त बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांच्या हस्ते ब्लॅंकेट वाटप करण्यात येणार आहे. शहरात रात्री उघड्यावर झोपलेले, फिरस्ते, निर्वासित यांना दोन हजार ब्लॅंकेट देण्यात येतील. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतून नववर्षानिमित्त पोलिसांकडून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्तालयांतर्गत २९ ठिकाणी नाकाबंदी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत २९ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. तसेच ७७५ पोलिसांचा फाैजफाटा तैनात करण्यात येणार आहे. गुन्हे शाखा व विशेष शाखा यांची सहा फिरती पथके नियुक्त केली आहेत. शहरातील अंतर्गत भागात देखील ही पथके गस्त घालणार आहेत. तसेच शहरातील काही भागातील वाहतूक देखील वळवण्यात आली. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक शाखेकडून देखील नियोजन केले असल्याचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले.
शहरातील पोलीस बंदोबस्त
उपायुक्त - ३
सहायक आयुक्त - ६
निरीक्षक - ३३
सहायक/उपनिरीक्षक - ९७
कर्मचारी - ६३५
राज्य राखीव दलाची तुकडी - १
नियंत्रण कक्षाकडील राखीव तुकडी - २