'पोलीस भरती लवकर करावी', उमेदवारांच्या आंदोलनाचा निर्णय मंगळवारी, फडणवीस यांच्यासोबत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 12:39 PM2024-06-23T12:39:01+5:302024-06-23T12:39:19+5:30
केवळ सरकारने चुकीची वय गणना केल्यामुळे विद्यार्थी भरतीपासून वंचित राहिले, आम्हाला एक संधी द्यावी, आंदोलकांची मागणी
पुणे : पोलीस भरती लवकर करावी, वय निघून गेलेल्या उमेदवारांना आणखी एक संधी द्यावी याची मागणी करत उमेदवारांनी शनिवारी बंडगार्डन पाेलिस ठाण्याच्या समाेरील चाैकात दुपारी ठिय्या दिला. त्यांना युवक काँग्रेसची साथ मिळाली तसेच आमदार रवींद्र धंगेकर यांनीही भेट दिली. तर सायंकाळी गिरीश महाजन यांनी उमेदवारांना भेट देत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाेबत बाेलणे करून दिले. त्यामुळे, आंदाेलक उमेदवार येत्या मंगळवारी फडणवीस यांना भेटून त्यावर चर्चा करणार आहेत.
कोरोना काळानंतर गेल्या दोन वर्षांपासून सरकारनेपोलिस भरती केली नाही. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुण-तरुणींना एक संधी द्यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले. परंतु पाेलिसांनी त्यांना अडवल्यानंतर त्यांनी चाैकाच्या मधाेमध ठिय्या दिला. सरकारने दिलेले आश्वासन पाळले पाहिजे, संधी मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, न्याय द्या, न्याय द्या फडणवीस साहेब न्याय द्या, या घोषणांनी पोलिस भरती तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला हाेता.
केवळ सरकारने चुकीची वय गणना केल्यामुळे विद्यार्थी भरतीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आम्हाला एक संधी द्यावी, अशी मागणी विद्यार्थी आंदोलनाद्वारे करत आहेत. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल शिरसाट, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन, उपाध्यक्ष स्वप्निल नाईक, प्रथमेश आबनावे, पुणे शहर युवक सरचिटणीस सुजित गोसावी उपस्थित होते.
सध्या सुरू असलेली पोलिस भरती ही २०२२ मधील आहे. परंतु राज्य सरकारने मुलांचे वय गणना करताना २०२४ वर्ष पकडले आहे. त्याचा फाटका आम्हाला बसत आहे. पोलिस भरतीसाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून सराव सुरू आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे आम्हाला पोलिस भरतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत सरकार निर्णय बदलणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहे, अशी प्रतिक्रिया उमेदवार सागर माळी यांनी दिली.