रूपाली पाटील यांना पोलिसांनी केला मज्जाव
By admin | Published: February 22, 2017 03:03 AM2017-02-22T03:03:31+5:302017-02-22T03:03:31+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रूपाली पाटील या प्रभागातील मतदान केंद्राचा आढावा घेत असताना
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रूपाली पाटील या प्रभागातील मतदान केंद्राचा आढावा घेत असताना आदर्श विद्यालयात तेथील पोलीस निरीक्षकाने त्यांना बाहेर जाण्यास सांगितले़ त्यावरून तेथे तणाव निर्माण झाला़ परंतु, केंद्राधिकाऱ्यांनी वेळीच पोलीस निरीक्षकास समज दिल्याने पुढील प्रसंग टळला़ रूपाली पाटील या मतदान केंद्राचा आढावा घेत सकाळी दहाच्या सुमारास बाजीराव रोडवरील आदर्श विद्यालयात गेल्या़ त्या तेथे पाहणी करीत असताना बाहेरगावाहून बंदोबस्तासाठी आलेल्या एका पोलीस निरीक्षकाने त्यांना येथे थांबू नका, बाहेर जा, असे सांगितले़ त्यावर त्यांनी तुम्ही कोणत्या कायद्यानुसार आपल्याला बाहेर जाण्यास सांगता, अशी विचारणा केली़ त्यावर त्यांनी मी सांगतो तोच कायदा,असे म्हणून त्यांना बाहेर जाण्यास सांगू लागले़ त्यांचा आवाज ऐकून अनेक जण तेथे जमले़ तेव्हा पाटील यांनी केंद्रप्रमुख यांच्या कानावर ही बाब घातली़ त्यानंतर येथील केंद्रप्रमुख यांनी या पोलीस अधिकाऱ्यांना समज देऊन, अशा प्रकारे उमेदवारांना मतदान केंद्रात थांबण्यास मज्जाव करू शकत नाही, असे सांगितले़ (प्रतिनिधी)