सिनेस्टाईलने पाठलाग करुन अपहरण केलेल्या महिलेची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 10:10 PM2019-04-10T22:10:02+5:302019-04-10T22:11:40+5:30
सिनेस्टाईल पाठलाग करत पाेलिसांनी अपहरण केलेल्या महिलेची सुखरुप सुटका केली.
पुणे : दिवसाढवळ्या एका महिलेचे अपहरण केले जात असल्याचे समजल्यावर शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. पाठोपाठ अपहरण केलेल्या मोटारीचा शोध सुरु झाला. ती गाडी वाघोलीहून फुलगावकडे जात असल्याचे समजले. पोलिसांनी या गाडीचा पाठलाग सुरु केला. तेथून ती गाडी वडु बुद्रककडे गेल्याचे समजल्यावर सर्व पोलिसांच्या गाड्या त्या दिशेने गेल्या. शेवटी तीन तासांच्या प्रयत्नानंतर ही गाडी पकडण्यात पोलिसांना यश आले. एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा प्रकार सुरु होता. गाडीतील महिलेकडे चौकशी केल्यावर वेगळीच माहिती समोर आली. मुलीने केलेले लग्न मान्य नसल्यामुळे मुलीच्या आईने इतर दोघांच्या मदतीने मुलाच्या आईचे अपहरण केल्याचे उघड झाले.
पोलिसांनी मुलीच्या आईसह तिघांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अंजली संजय घोलप (वय १९, रा़ वडगाव शेरी), कविता संजय घोलप (वय ४०, रा़ वडगाव शेरी) आणि तुषार बबन चौधरी (वय २१, रा़ बोलेगाव, ता़ खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुनंदा कृष्णा महाडिक (वय ५०, रा़ पुरम सोसायटी, धानोरी) असे अपहरण केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की,धानोरी येथे राहणाऱ्या सुनंदा महाडिक यांच्या मुलाने कविता घोलप यांच्या मुलीबरोबर लग्न केले. त्यामुळे संतापलेल्या घोलप यांनी सुनंदा महाडिक यांचे अपहरण करण्याचा कट रचला. त्या हाऊस किपिंगचे काम करतात. मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजता त्या विश्रांतवाडी येथील केकन पेट्रोलपंपासमोर धानोरीला जाण्यासाठी थांबल्या असताना कारमधून आलेल्यांनी त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले. याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. या माहितीच्या आधारे खंडणी विरोधी पथक तातडीने तेथे रवाना झाले. त्यांना ही कार वाघोलीकडे गेल्याचे समजले. तेव्हा पोलिसांनी वाघोली येथील पोलिसांना कळविले. तेव्हा ती कार फुलगावकडे गेल्याची माहिती मिळाली. तेथून ती वढु बुदु्रककडे गेल्याचे समजल्यावर पोलीस तिकडे गेले. तेव्हा त्यांना काही अंतरावर ती कार दिसली़ त्यांनी तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली़ पोलिसांना पाहून ती कारही वेगाने जाऊ लागली़ मात्र, त्यांच्या दुदैवाने व पोलिसांच्या सुदैवाने या कारला पुढे एक बैलगाडी आडवी आली. त्यामुळे ती हळू झाली. ही संधी साधून पोलिसांनी तातडीने तिला अडवून आतील महिलांना ताब्यात घेतले. तेव्हा कारमधील सुनंदा महाडिक यांनी मोठ्याने ओरडून मला यांनी जबरदस्तीने पळवून आणल्याचे सांगितले. त्यांना मोठ्या प्रमाणावर मारहाण करण्यात आली आहे.
ही कामगिरी गुन्हे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक पोलिस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, उपनिरीक्षक निखील पवार, आनंद रावडे, कर्मचारी प्रमोद मगर, मनोज शिंदे, सुनिल चिखले, विजय गुरव, रमेश गरुड, फिरोज बागवान, सचिन कोकरे, मंगेश पवार, नारायण बनकर यांच्या पथकाने केली.
मुलाच्या आईला ओलीस ठेवण्याचा होता प्लॅन
महाडिक यांचा मुलगा २३ वर्षाचा असून तो खासगी कंपनीत कामाला आहे. तर घोलप यांची मुलगी २१ वर्षांची असून ती पदवीधर आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे. ही गोष्ट दोन्ही घरात माहिती आहे. घोलप कुटुंबांचा विरोध असल्याने दोघांनी पळून जाऊन ३ एप्रिल रोजी विवाह केला. त्यानंतर दोघेही पळून गेले आहेत. घोलप हे महाडिक यांच्या घरी आले होते. त्यांनी मुलगी कोठे आहे, याची चौकशीही केली. पण, महाडिक यांनी आम्हाला माहिती नाही़ ते दोघेही घरी आले नसल्याचे सांगितले. महाडिक खोटे बोलत असल्याचा त्यांना संशय होता. त्यामुळे सुनंदा महाडिक यांचे अपहरण करुन त्यांना ओलीस ठेवायचे व मुलीला परत आपल्या घरी आणायचे असा प्लॅन घोलप कुटुंबियांनी आखला होता. परंतु, पोलिसांनी वेळीच हालचाल केल्याने त्यांचा हा कट अयशस्वी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.