बिडी दिली नाही म्ह्णून 'तो' पोलिसांच्या अंगावर थुंकला मग 'खाकी हिसका' दाखवून त्याला वठणीवर आणला..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 11:40 PM2020-04-20T23:40:57+5:302020-04-20T23:50:58+5:30
शेल्टर मधून पळून जाण्याचा केला प्रयत्न
पुणे : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात यावा यासाठी एकीकडे पोलीस अहोरात्र नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन करत आहेत. विनाकारण बाहेर न फिरता घरात राहून स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यास बजावत आहेत. अशा परिस्थितीत एका महाभागाने पोलिसांच्या अंगावर थुंकुन आपला राग व्यक्त केला. त्याला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवून जागेवर आणला. या महाशयांना बिडी ओढण्याची हुक्की आली. ती इतकी अनावर झाली की त्यासाठी आक्रस्ताळेपणा सुरू केला. पोलिसांनी अनेकदा समजावूनही तो ऐकेना. यात कहर म्हणजे तो चक्क पोलिसांच्या अंगावर थुंकला. मग मात्र पोलिसांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली. कोथरूड येथील एका शेल्टरमध्ये ही घटना घडली.
या घटनेविषयी अधिक माहिती देताना पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी सांगितले, कोथरुड शिवाजी महाराज स्मारकाजवळ पालिकेच्या शाळेत नागरिकांना राहण्याची सोय केली आहे. पोलिस नियंत्रण कक्षाकडून कोथरूड पोलिसांना एक शेल्टर केलेली अमित कुमार नावाची व्यक्ती पळून गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस कर्मचारी शेल्टर केलेल्या त्या ठिकाणी पोहचली. त्या ठिकाणी तब्बल 40 जण राहतात. त्याच्या विषयी माहिती घेतल्यानंतर त्याने शेल्टरच्या मागच्या बाजूच्या काचा फोडल्या होत्या. त्याच्यासोबत राहणार्या नागरिकांना त्रास देण्याच्या हेतूने त्याने शौचालयात घाणही केली होती. त्याला तंबाखू, सिगारेट मिळत नाही याच कारणाने तो तेथून पळून गेला. दरम्यान, पळून गेलेल्या त्या तरूणाला पोलिसांनी शोध घेऊन पुन्हा शेल्टर जवळ आणले. परंतु, आत जाण्यासाठी तो नकार देत होता. कोरोनाचा संसंर्गाविषयी सर्वच स्तरावर खबरदारी घेतली जात असताना तो तरूण पोलिस आणि तेथील मनपा कर्मचार्यांच्या व नागरिकांच्या अंगावर थुंकला. याच दरम्यान तो पोलिसांना शिवीगाळ करत असल्याने शेवटी पोलिसांना बळाचा वापर केला. त्यानंतर तो तेथे आता सध्या राहत आहे. पण त्याचा त्याच्या गावी बिहारला जाण्याचा आग्रह आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे त्याला पाठविणे शक्य नसल्याचे त्याला समजुन सांगण्यात आल्याचे जोशी म्हणाल्या.
..............................................
* मुझे बिडी चाहिए...
परराज्यातील कामगार, मजूर यांना सध्या राहण्यासाठी काही शेल्टर हाऊसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना तिथे जेवण, चहा दिला जातो. अमित कुमार देखील काही दिवसांपासून त्याठिकाणी आहे. त्याला बिडी फुकण्याचे व्यसन आहे. कुठेही बिडी न मिळाल्याने त्याची चिडचिड सुरू झाली. दरम्यान चहाची वेळ झाली असताना त्याने अचानक पोलिसांची नजर चुकून पळ काढला. त्यानंतर त्याला पुन्हा पकडून आणल्यानंतर 'मुझे बिडी चाहीए' अशी मागणी तो करत होता. असे पोलिसांनी सांगितले.