माहेरी आलेल्या विवाहितेचे चोरीला गेलेले दागिने अन् रोकड पोलिसांमुळे एका तासात परत मिळाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 09:15 PM2021-07-14T21:15:34+5:302021-07-14T21:20:37+5:30
बारामती शहर पोलिसांनी एका तासात गुन्ह्याचा लावलेला वेगवान छडा कौतुकाचा विषय ठरत आहे.
बारामती: बारामती शहरात माहेरी आलेल्या विवाहितेला शहर पोलिसांनी अवघ्या एका तासात तिचे चोरीला गेलेल्या दागिन्यांसह रोख रक्कम परत मिळवुन दिली आहे. शहर पोलिसांनी एका तासात गुन्ह्याचा लावलेला वेगवान छडा कौतुकाचा विषय ठरत आहे. .
पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री विजय जगदाळे (वय ३५, रा. सगुना मातानगर फलटण, ता. फलटण जि. सातारा) असे या विवाहितेचे नाव आहे. बुधवारी(दि १४) शहरातील गुणवडी चौकात विवाहित महिला एका बेकरीत गेली होती. यावेळी टेम्पो (क्र.एमएच ११ एजी—६५६८) मध्ये ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबवली. यामध्ये बॅगेत असणारे २५ हजार रुपये किमतीच्या अर्ध्या तोळा वजनाची सोन्याची कानातील कर्णफुले ,१३ हजार रुपये किंमतीच्या२.७५ ग्रॅम वजनाच्या कानातील सोन्याच्या रिंगांसह एक हजार रुपये रोख चोरीला गेले होते.
त्यानंतर घाबरलेल्या महिलेने शहर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.पोलिसांनी माहेरी आलेल्या महिलेची अवस्था ओळखुन तातडीने सूत्रे हलवत पोलीस यंत्रणेला आदेश दिले. महिला खरेदीसाठी गेलेल्या बेकरीचे सीसीटीव्ही पोलिसांनी मिळवत विवाहितेला दाखविण्यात आले.यावेळी सीसीटीव्ही तील महिलेचा चेहऱ्यावरुन पोलिसांनी रेकॉर्डवरील महिलेचे छायाचित्र शोधले.विवाहितेला दाखवल्यानंतर तिने देखील बॅग चोरताना या महिलेला ओळखले.त्यानंतर पोलीस अवघ्या एका तासात त्या महिलेपर्यंत पोहचले. शहर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेत विवाहितेचे दागिने,रोख रक्कम परत मिळवली. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे या तत्परतेबद्दल कौतुक होत आहे.