बारामतीत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर, दंडात्मक कारवाईला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 05:22 PM2021-04-23T17:22:42+5:302021-04-23T17:22:54+5:30
जिल्हाबंदीच्या आदेशानंतर पुणे - सातारा सीमेवर पोलिसांचा फौजफाटा तैनात
सांगवी: राज्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काल रात्री झालेल्या जिल्हाबंदीच्या आदेशानंतर पुणे - सातारा सीमेवर बारामती तालुका पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३०-४० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर पोलिसांकडून नागरिकांना शासनाच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात विनवणी करून विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात विनापरवाना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाबंदीच्या आदेशानंतर देखील बारामती- फलटण रस्त्यावरून अनेक वाहने विनाकारण ये-जा करत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे.
राज्यासह जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या उद्रेकामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. त्यातच इतर जिल्ह्यातून बाधित रुग्ण पुणे जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल होत आहेत. यामुळे बारामतीतील रुग्णालय पूर्णपणे भरली असून जिल्ह्यातील रुग्णांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. त्या अनुषंगाने बारामती तालुक्यातील सांगवी येथे सातारा सीमेवर आता पोलिसांचा फौज फाटा तैनात करून कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान सातारा, सांगली, फलटण वरून येणाऱ्या दुचाकीसह मोठ्या वाहनांची कसून चौकशी करून नियम तोडणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. राज्यात होतं असणाऱ्या कोरोना रुग्णांच्या उद्रेकाचा परिमाण लक्षात आल्याने राज्यशासनाने राज्यातील जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी सुरू केली आहे. सध्या पोलिसांकडून बारामतीत परजिल्ह्यातून अथवा विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी केली जात आहे.
त्यानुसार बारामती - फलटण रस्त्यावर नाकाबंदी दरम्यान बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,पोलीस हवालदार सुरेश साळवे,पोलीस नाईक रावसाहेब गायकवाड,निखिल जाधव,योगेश चितारे,दीपक दराडे,होमगार्ड आसिफ शेख हे कारवाई करत आहेत.