VIDEO | पोलिसांचे कौतुकास्पद काम! जीवाची पर्वा न करता पाण्यात वाहून जाणाऱ्याचे वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 11:48 AM2022-07-09T11:48:40+5:302022-07-09T12:12:33+5:30
पुणे शहरातील घटना...
शिवणे (पुणे): शुक्रवारी संध्याकाळी गस्तीवर असताना पोलीस शिपाई सद्दाम शेख आणि अजित पोकरे यांना एक तरुण ओढ्याच्या पाण्यात आत्महत्येचा प्रयत्न असल्याची खबर मिळाली. दोघांनी क्षणाचाही विलंब न लावता बागुल उद्यान जवळ असलेल्या ओढ्याजवळ पोहोचले. सद्दाम शेख यांनी ओढ्यात असलेल्या तरुणाला पाण्यात उतरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या तरुणाने त्यांना न जुमानता त्यांना धक्का देऊन पाण्यात उडी मारली पाठोपाठ सद्दाम यांनीदेखील ओढ्यामध्ये उडी मारली.
ओढा जवळपास १० फूट खोल असल्याचे सांगण्यात आले. शेख यांनी जीवाची पर्वा न करता त्या तरुणाला ओढ्याच्या कडेला ओढत आणले आणि त्याचे प्राण वाचवले. हे घडत असताना परिसरातील शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती, सद्दाम शेख यांच्या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केले आणि सुटकेचा निश्वास टाकला.
एखादी नाट्यमय घटना घडावी त्याप्रमाणे बागुल उद्यान जवळील ओढा परिसरात घडली. दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई सद्दाम शेख व अजित पोकरे हे संध्याकाळी गस्त घालत होते. त्याचवेळी पोलीस नियंत्रण कक्षातून एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची खबर मिळाली, खबर मिळताच दोघेही घटनास्थळी पोहोचले.
पुणे : पोलिसांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाचे प्राण वाचवले#pune#police@PuneCityPolice@CPPuneCity@puneruralpolicepic.twitter.com/Xz5CsFKKYt
— Lokmat (@lokmat) July 9, 2022
गेल्या काही दिवसात होणाऱ्या सततच्या पावसामुळे ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. शेख आणि पोकरे जेव्हा पोहोचले तेव्हा एक तरुण ओढ्यामध्ये उभा असल्याचे दिसला त्याला पाण्याच्या बाहेर येण्यास सांगितले परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष करून अजून मधोमध जाण्याचा प्रयत्न करत होता. अखेर पोकरे यांनी दोरी धरून शेख ओढ्यात उतरले आणि त्यांनी तरुणाला बाहेर आणण्याचा प्रयत्न केला परंतू त्या तरुणाने शेख ह्यांच्या हाताला हिसका देत पाण्यात उडी मारली आणि पाण्याच्या वेगामुळे तो वाहू लागला.
त्यावेळी सद्दाम शेख यांनी जीवाची पर्वा न करता त्या वेगवान पाण्यात उडी मारून त्या तरुणाला वाचवले आणि ओढ्याच्या बाहेर आणले. ही घटना घडत असताना परिसरातील शेकडो नागरिक ही घटना मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद करत होते. सद्दाम शेख यांनी दाखवलेल्या धाडस आणि साहसी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.