पोलिसांनी सूतावरुन गाठला स्वर्ग ; तब्बल ७ दिवस मुंबईत राबविली शोध मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 12:47 PM2019-04-30T12:47:36+5:302019-04-30T12:48:44+5:30
वारजे माळवाडी येथील एक १५ वर्षाचा मुलगा सकाळी शाळेत जातो, म्हणून गेला तो परत आलाच नाही़ त्याच्याकडील मोबाईलही बंद होता़.
पुणे : वारजे माळवाडी येथील एक १५ वर्षाचा मुलगा सकाळी शाळेत जातो, म्हणून गेला तो परत आलाच नाही़. त्याच्याकडील मोबाईलही बंद होता़. कोणताही धागा दोरा नव्हता़ अशातून तो मुंबईला असल्याचा एक धागा पोलिसांच्या हाती लागला़. त्या एका धाग्यावरुन मुंबईच्या गर्दीत तब्बल सात दिवस तपास करुन मुलाचा शोध लावण्याची कामगिरी वारजे पोलिसांनी केली़.
या मुलाचे वडिल माळी काम करतात, तर आई गृहिणी आहे़ हा १५ वर्षाचा मुलगा २० एप्रिलला सकाळी साडेसात वाजता शाळेत जातो, म्हणून गेला तो परत आला नाही़. अल्पवयीन असल्याने वारजे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला़. मुलाकडे असलेला मोबाईलही बंद असल्याचे आढळून आले़. त्यामुळे एवढ्या दुनियेत त्याला शोधायचे कोठे असा प्रश्न पोलिसांना पडला़. त्यात त्याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर तो मुंबईत असल्याचे आढळून आले़. त्याच्या मोबाईलवर मुंबईतील एका नंबर वरुन मेसेज आले होते़ हा इतकाच धागा होता़. आता त्यावरुन मुंबई सारख्या अफाट गर्दीच्या शहरात त्याचा शोध घेणे म्हणजे गवतातून सुई शोधण्यासारखेच होते़. ज्या नंबरवरुन त्याच्या मोबाईलवर मेसेज गेले होते़. त्या टॅक्सीचालकाचा पोलिसांनी शोध लावला़. त्याला मुलाचा फोटो दाखविल्यावर त्याने तो ओळखला व माझ्या मोबाईलवरुन त्याने त्याच्या हरविलेल्या मोबाईलवर मेसेज पाठविला होता़. मी त्याला एक दिवस घरी राहायला दिले़. दुसऱ्या दिवशी तो निघून गेला इतकीच माहिती पोलिसांना मिळाली़. त्यातून तो मुंबईत असल्याची खात्री पडली़. त्यानंतर पोलिसांनी आग्रीपाडा, भायखळा, डोंगरी मश्जिद बंदर अशा ठिकाणी त्याचा प्रत्यक्ष लोकांना भेटून, फोटो दाखवून शोध सुरु केला़. तेव्हा मश्जिद बंदर येथे एका ठिकाणी तो शनिवारी सापडला़. पुण्याला आणून त्यांनी त्याला आई वडिलांच्या स्वाधीन केले. मौजमजेसाठी आपण मुंबईला गेल्याचे तर आईवडिलांच्या भांडणामुळे मुंबईला गेल्याचे अशी वेगवेगळी कारणे तो सांगता़े़. कारण काहीही असले तरी सूतावरुन स्वर्ग गाठल्याचा पोलिसांना आनंद झाला़.
सलग चार दिवस अखंड कष्ट घेऊन ही कामगिरी वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, सहायक निरीक्षक लक्ष्मण उकिर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीन बोधे, पोलीस नाईक धनंजय ताजणे, अमोल काटकर व चंद्रकांत जाधव यांनी केली़.ले