पोलिस निरीक्षक घनवट याचा कोल्हापुरातील फ्लॅट सील

By admin | Published: April 17, 2017 07:36 PM2017-04-17T19:36:29+5:302017-04-17T19:36:29+5:30

संशयितांनी नातेवाईकांच्या नावे गुंतविला पैसा : बँक खाती गोठवली वारणा चोरी प्रकरणाची व्याप्ती मोठी : विश्वास नांगरे-पाटील

Police Sector, Ghanavat, flat seal in Kolhapur | पोलिस निरीक्षक घनवट याचा कोल्हापुरातील फ्लॅट सील

पोलिस निरीक्षक घनवट याचा कोल्हापुरातील फ्लॅट सील

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १७ : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनी चोरी प्रकरणात संगनमताने नऊ कोटी रुपये परस्पर हडप करणाऱ्या पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट याचा कोल्हापुरातील ३४ लाखांचा अलिशान फ्लॅट सील केला. चोरीतील १८ लाख रुपये त्याच्या बँक खात्यावर असल्याचे निष्पन्न झाल्याने तेही गोठविले.

घनवटसह सहा. पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे व अन्य संशयितांनी पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत जमीन खरेदी, स्थावर मालमत्ता आदी व्यवसायात नातेवाईकांच्या नावे चोरीचा पैसा गुंतविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही संपूर्ण मालमत्ता कायदेशीर प्रक्रियेद्वारे जप्त केली जात आहे. या प्रकरणी भक्कम पुरावे मिळाले असून त्याची व्याप्ती वाढत आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी दिली.

वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनी बिल्डिंग नंबर ५ मधील चोरी प्रकरणात तपासाच्या नावाखाली सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालिन पोलिस निरीक्षक घनवट, सहा. पोलिस निरीक्षक चंदनशिवे, सहा. फौजदार शरद कुरळपकर, हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलिस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांनी संशयित मैनुद्दीन मुल्ला याला हाताशी धरून ९ कोटी १८ लाख रुपये लाटले. या प्रकरणी या सर्वांच्या विरोधात कोडोली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.

निरीक्षक घनवट याने चोरीचे ३ कोटी १८ लाख रुपये घेतले. तर सहा. पोलिस निरीक्षक चंदनशिवे याने ६ कोटी रुपये घेऊन ते नातेवाईक प्रवीण सावंत याच्या बँक खात्यावर भरले. अन्य संशयित सहकाऱ्यांना कमी-जास्त प्रमाणात रक्कम देत त्यांनाही खूश ठेवले होते. या प्रकरणी तपासासंबंधी विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांना विचारले असता, कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या तपासात या सर्वांनी ही रक्कम स्वत:च्या नावे न ठेवता नातेवाईकांच्या नावे ठेवली तर काहींनी जमीन, स्थावर मालमत्ता नातेवाईकांच्या नावे खरेदी करून गुंतविल्याचे निष्पन्न झाले आहे.

घनवट याने कोल्हापुरात या रकमेतून अलिशान फ्लॅट खरेदी केला होता. तो सील केला आहे तसेच त्याच्या बँक खात्यावर १८ लाख रुपये मिळाले. त्याच्यासह अन्य संशयितांची बँक खाती गोठविली आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून हा तपास सुरू आहे. संशयितांच्या विरोधात भक्कम पुरावे आहेत. प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याने तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी)कडे देण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.दोन दिवसांत हा तपास त्यांचेकडे वर्ग होईल.

‘ईडी’चे पथक कोल्हापुरात येणार

वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतील बेहिशेबी रकमेची दिल्लीच्या ‘ईडी’ (सक्त वसुली संचलनालय)च्या विशेष पथकाकडून गोपनीय चौकशी सुरू आहे. या पथकाने फिर्यादी कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक झुंझारराव सरनोबत यांची यापूर्वी चौकशी केली आहे. ही बेहिशेबी रक्कम कायदेशीर की अवैध मार्गाने मिळविली, हे ‘ईडी’च्या चौकशीतून पुढे येणार आहे. त्याचबरोबर प्राप्तिकर खात्याकडूनही गोपनीय तपास सुरू आहे. ‘ईडी’चे पथक पुन्हा कोल्हापुरात येऊन संशयित पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडे चौकशी करणार आहे.

फिर्यादीला आमिष

झुंजार सरनोबत यांनी सहा महिन्यांपूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. ही तक्रार मागे घ्यावी यासाठी संशयित विश्वनाथ घनवट याने सरनोबत यांना रोख १८ लाख रुपये व चोरीच्या पैशांतून कोल्हापुरात खरेदी केलेला फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले होते, अशी चर्चा पोलिस दलात आहे.

संशयितांना सीआयडीचे पथक करणार अटक

संशयित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चोरी, ठकबाजी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या रकमेचा हिशेब कागदोपत्री घेणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी कोल्हापूर पोलिस अटकेची घाई करणार नाहीत. तपास सीआयडीकडे वर्ग होताच त्यांचे पथक या संशयितांना अटक करणार आहे. या सर्व संशयितांचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असले तरी त्यांना जामीन मिळणे कठीण असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Police Sector, Ghanavat, flat seal in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.