पिंपरीत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक; चरस, गांजा असा तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 05:04 PM2021-04-10T17:04:55+5:302021-04-10T17:05:32+5:30
पोलिसांकडून जोरदार कारवाईला सुरुवात
पिंपरी: पिंपरीत अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ झाल्याने पोलिसांकडून जोरदार कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये चरससह गांजासहित एकूण ४ लाख २९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी बावधन येथे ही कारवाई केली असून याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
प्रशांत अनिल माळी (वय ३०), तेजस पुनमचंद डांगी (वय २६), सुजित गोरख दगडे (वय २३), राहूल कवडे, समीर शेख (सर्व रा. मुळशी), ओमकार राजेंद्र नगरकर (वय २२, रा. पुणे), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकातील उपनिरीक्षक राजेंद्र गोविंद महाडिक (वय ५४) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळी आणि नगरकर यांच्या ताब्यातील दुचाकीमधून २९८ ग्रॅम गांजा आणि नऊ ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आले. डांगी आणि दगडे यांच्या ताब्यातून १२ किलो ४३४ ग्रॅम गांजा इलेक्ट्रॉनिक छोटा वजनकाटा, गांजा पॅकिंग मशिन आणि रोख रक्कगम हस्तगत केली. समीर शेख आणि कवडे यांच्या खोलीतून एक किलो ४२८ ग्रॅम गांजा आणि नऊ ग्रॅम चरस असा एकूण चार लाख २९ हजार ७५० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.