पुण्यात निवृत्त पोलीस महासंचालकांच्या बहिणीच्या घरात चोरी; एक लाखांचे दागिने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 03:14 PM2022-01-07T15:14:41+5:302022-01-07T15:14:51+5:30
चोरट्यांनी तळमजल्यावर असलेल्या सदनिकेच्या खिडकीचे गज कापून रूममधील एक लाखांचे दागिने चोरून नेले.
पुणे : निवृत्त पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांच्या बहिणीच्या घरात चोरीचा प्रकार घडला. ही घटना गुरूवारी सायंकाळी प्रभात रस्ता भागात घडली. चोरट्यांनी तळमजल्यावर असलेल्या सदनिकेच्या खिडकीचे गज कापून रूममधील एक लाखांचे दागिने चोरून नेले.
उज्वला वसंत पारसनीस (वय ६३, रा. अभिमान अपार्टमेंट, पाचवी गल्ली, प्रभात रस्ता) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उज्वला पारसनीस या घरात एकटयाच राहतात. प्रभात रस्त्यावरील अभिमान अपार्टमेंटमध्ये पारसनीस यांची तळमजल्यावर सदनिका आहे. गुरूवारी (दि. ६ ) त्या सायंकाळी एका कार्यक्रमासाठी बाहेर गेल्या होत्या. रात्री त्या घरी परतल्यानंतर सदनिकेच्या खिडकीचे गज कापल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी रूममधील एक लाख रुपयांचे दागिने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला.
पारसनीस यांनी डेक्कन पोलिसांना या घटनेची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यांनी केलेले चित्रीकरण तपासण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याद्वारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.