तळेघर येथे उभारणार पोलीस चाैकी : जीवन माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:12 AM2021-09-24T04:12:52+5:302021-09-24T04:12:52+5:30
तळेघर येथे ग्रामसचिवालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये माने बोलत होते. तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा भीमाशंकर पाटण व आहुपे या तीनही ...
तळेघर येथे ग्रामसचिवालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये माने बोलत होते. तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा भीमाशंकर पाटण व आहुपे या तीनही खोऱ्यांमध्ये विखुरला आहे. या भागातील लोकांच्या सुरक्षा कायदा व सुव्यवस्थेसाठी ६० ते ७० कि. मी. असणाऱ्या घोडेगाव येथे पोलीस ठाणे उभारण्यात आले. या ठाण्याअंर्तगत ७३ गावे येत असून, गावांच्या सुरक्षिततेसाठी व कायदा सुव्यवस्थेकरिता केवळ ३७ पोलीस कर्मचारी नेमले आहेत. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ७३ गावांपैकी दुर्गम आदिवासी भागामध्ये बहुतांश ५२ गावे असून, त्यापैकी डिंभे धरणाच्या आतील अतिशय दुर्गम डोंगर दऱ्याखोऱ्यांमध्ये ३७ गावे वसलेली आहेत. येथील लोकांच्या सुरक्षा कायदा व सुव्यवस्थेसाठी कित्येक वर्षांपासून डिंभे खु., तळेघर, बोरघर, व भीमाशंकर या चार पोलीस चौक्या उभारण्यात आल्या. परंतु घोडेगाव पोलीस ठाण्यामध्ये कर्मचाऱ्यांचे मनुष्य बळ कमी असल्यामुळे या चौक्या केवळ कागदोपत्री आहेत. प्रत्यक्षात त्याचा काहीच वापर सुरु नाही.
या परिस्थितीचा विचार करता श्री क्षेत्र भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व या आदिवासी भागातील आदिवासी बांधवांची कायदा व सुरक्षा सुव्यवस्था अबाधित राहावी. पोलीस ठाण्याविषयी काही तक्रारी असल्यास ७० ते ८० किमी घोडेगाव येथे येण्यास हेलपाटे पडू नये म्हणून घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी पुढाकार घेऊन तळेघर येथील चौकी सुरु करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तळेघर येथील ग्रामस्थांची बैठक घेतली. यानुसार महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर रोजी तळेघर चौकी सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी तळेघरचे सरपंच चंद्रकांत उगले, माजी उपसभापती सलीम तांबोळी, आदिवासी विकास सोसायटीचे सचिव तुकाराम मोरमारे, तंटामुक्ती अध्यक्ष नंदू मेचकर, सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहंडुळे, राजेंद्र जाधव, ग्रामविकास अधिकारी पांडुरंग कडाळे, स्वप्नील कानडे उपस्थित होते.
फोटो : तळेघर (ता. आंबेगाव) येथे बैठकीमध्ये बोलताना घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने.