तक्रार घ्यायला कुणीच नसल्याच्या रागाने फोडली पोलीस चौकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 09:29 PM2018-05-24T21:29:46+5:302018-05-24T21:29:46+5:30
वारजे माळवाडी भागात कायम दहशतीचे वातावरण असते. टोळक्याकडून पार्किंग केलेल्या वाहनांची तोडफोड केली जाते. आज या घटनेचा फटका पोलिसांनाच बसला आहे.
पुणे : पोलीस चौकीत तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलीस नसल्याने चक्क चौकीच फोडल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी(दि.२४ मे) रात्री घडला. वारजे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या रामनगर पोलीस चौकीत हा प्रकार घडला. याप्रकरणी वारजे पोलिसांनी विठ्ठल पडवळ याला अटक केली असून त्याचा साथीदार जाम्या वाघमारे हा पसार झाला आहे़.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनगर परिसरात दोन गटामध्ये झालेल्या भांडणानंतर दोघेजण रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत रामनगर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आले होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी गस्त घालण्यासाठी बाहेर गेल्याने दोघांना तक्रार द्यायची असल्याने तेथे कोणीच नसल्याने वैतागून त्यातील एकाने चौकीतील टेबलवरील वस्तुने काच फोडली़. बुधवारी रात्री हा प्रकार लक्षात आला नाही़ गुरुवारी सकाळी तोडफोड झाल्याचे लक्षात आले़.
वारजे माळवाडी भागात दोन टोळक्याच्या वादातून कायम दहशतीचे वातावरण असते. किरकोळ वादात अचानक टोळक्याकडून पार्किंग केलेल्या वाहनांची तोडफोड केली जाते. आज या घटनेचा फटका पोलिसांनाच बसला आहे. याप्रकरणी विठ्ठल पडवळ याला अटक केले असल्याचे वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे यांनी दिली.