पोलीस ठाण्यात स्वतंत्र वाहतूक शाखा, वाहतूक समस्येवर उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 10:47 PM2018-11-11T22:47:38+5:302018-11-11T22:47:58+5:30

वाहतूक समस्येवर उपाययोजना : पोलीस निरीक्षकांना आराखडा बनविण्याचे आदेश

In the police station, there is an independent transport branch, a traffic problem | पोलीस ठाण्यात स्वतंत्र वाहतूक शाखा, वाहतूक समस्येवर उपाययोजना

पोलीस ठाण्यात स्वतंत्र वाहतूक शाखा, वाहतूक समस्येवर उपाययोजना

Next

शिरूर : पुणे जिल्ह्यातील नगरपालिका आणि शहरांमध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वत्र वाहतूककोंडीची समस्या वाढत आहे़ ही वाहतूक समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू करण्यात येणार आहे़ पोलीस निरीक्षकांनावाहतूक आराखडा बनविण्याचे आदेश दिले असल्याचे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले़

पुणे जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग व महत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा लक्षात घेता विशेष बाब म्हणून पुणे जिल्ह्यासाठी जादा मनुष्यबळ देण्याची मागणी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले़ कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी काही वर्षांपूर्वी परिक्षेत्रातील समस्या जाणून घेण्यासाठी व त्यावर विचारविनिमय करून समस्या सोडविण्यासाठी पोलीस ठाण्यांच्या स्तरावर प्रतिष्ठित नागरिकांचा पीएस-१०० असा ग्रुप तयार केला आहे. याच धर्तीवर पोलीस अधीक्षक पाटील यांनी पुणे जिल्ह्यात एसपी-१०० ग्रुप तयार केला आहे. या सदस्यांची मुख्यालयात बैठक घेण्यात आली. या सदस्यांकडून पाटील यांनी जिल्ह्यातील समस्या जाणून घेतल्या. यात प्रामुख्याने वाहतूक समस्येचा मुद्दा बहुतांशी सदस्यांनी मांडला. यावर बोलताना पाटील म्हणाले, की जिल्ह्यातून पाच मोठे महामार्ग जातात. औद्योगिकरणाचे जाळेही मोठे आहे. यामुळे जिल्ह्यात वाहतुकीची मोठी समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी यात पोलिसांसह नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी, एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, स्थानिक स्वराज्य संस्था यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवला आहे. सर्व ठाणेप्रमुखांना वाहतूक आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचीही यात महत्त्वाची भूमिका आहे. मात्र ते सहकार्य करीत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकाºयांची बैठक बोलाविल्याचे पाटील यांनी सांगितले.

पोलीस ठाण्यातील अपुºया कर्मचारीसंख्येबाबतही अनेक सदस्य बोलले. यावर पाटील म्हणाले, विशेष बाब म्हणून पुणे जिल्ह्यासाठी जादा मनुष्यबळ निर्माण करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. महिला सुरक्षिततेच्या अनुषंगाने प्रत्येक गावात १५ महिलांची महिला सुरक्षा समिती तयार केली जाणार असून पोलीसपाटील त्या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.
अपघातावेळी रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी गोल्डन अवरमध्ये रुग्ण कसा हाताळावा, त्याला प्रथमोपचार कसा द्यावा, याचे वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देणार. तसेच अवैध धंद्यांवर कारवाई न करणाºया अधिकाºयांवर बदलीची कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आराखडा बनविण्यास सुरुवात
नवीन वाहतूक विकास आराखडे बनविण्याची प्रक्रिया सुरू करून ती गणपतीपूर्वी अमलात आणण्यात येत आहे. यासाठी महामार्गावरील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र वाहतूक विभाग करण्यात येईल. त्यामध्ये १ अधिकारी, ५ कर्मचारी आणि २५ ट्रॅफिक वॉर्डन यांचा समावेश करण्यात येईल. बारामती शहरसाठी वेगळा वाहतूक विभाग तयार करण्यात येणार असून त्यामध्ये १ अधिकारी, १५ कर्मचारी यांचा समावेश करण्यात येणार आहे.

एकेरी वाहतुकीचा पर्याय
महामार्गावरील अवजड वाहनांच्या वेळा नियंत्रित करण्यात येणार असून विशिष्ट वेळेतच अवजड वाहनांची वाहतूक करून वाहतुकीवरील ताण कमी केला जाईल.
खेड चाकण पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महामार्गाच्या वाहतूक समस्येसाठी विशेष पथक नेमले जाईल. त्यामध्ये १ अधिकारी, १० कर्मचारी यांचा समावेश करून खासगी जादाचे पेट्रोलिंग वाहनांचा समावेश करून घेण्यात येईल.

औद्योगिक सुरक्षेसाठी प्राधान्य
पुणे ग्रामीण पोलीस दलातील उद्योजकांच्या वेळोवेळी बैठका घेऊन त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील. औद्योगिक भागात गस्तीसाठी जादा पेट्रोलिंग वाहने नेमली जातील. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील गुंडावर एम.पी.डी.ए. तसचे एम. सी. ओ. सी. ए. (मोका) अंतर्गत कठोर कारवाया केल्या जातील. लॅन्डमाफिया, माथाडीमाफिया, वाळूमाफिया यांच्याविरुद्घ एम.पी.ए. एम. सी.ओ.सी.ए. (मोका), तसेच मुंबई पोलीस कायदा कलम ५५, मुंबई पोलीस कायदा कलम ५६ (तडीपारी) सारख्या कठोर कारवाया करून कोणत्याही सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका पुणे ग्रामीण पोलीस दलाची राहणार आहे.

बेशिस्त वाहनांवर कारवाईसाठी जिल्ह्यातील बºयाच पोलीस ठाण्यात क्रेन मंजूर करण्यात आली असून शहरांप्रमाणे आता ग्रामीण भागात कारवाई करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. नव्याने भरती करण्यात आलेल्या होमगार्ड्सचा वाहतूक नियंत्रणासाठी उपयोग करून घेणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

सीसीटीव्ही बसविणार
रस्ता सुरक्षा समिती, पी. डब्ल्यू. डी., सार्वजनिक बांधकाम विभाग, एन. एच. ए. आय. यांच्याशी संबंध साधून हॉटस्पॉटची डागडुजी करून अपघात होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही बसवून अपघाताचे गुन्हे उघडकीस येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे.
 

Web Title: In the police station, there is an independent transport branch, a traffic problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे