Anti Corruption Bureau: सत्तर हजारांची लाच मागणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 08:16 PM2021-12-02T20:16:09+5:302021-12-02T20:16:19+5:30
उपनिरीक्षक हेमा सोळुंके यांच्या सांगण्यावरून सहायक उपनिरीक्षक देसाई यांनी तक्रारदाराकडे एक लाखाची मागणी केली व तडजोडीअंती ७० हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार गुरुवारी (दि. २) सहायक उपनिरीक्षक देसाई यांनी तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाच स्वीकारली.
पिंपरी : लाच स्वीकारणाऱ्या सहायक फौजदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला धक्का मारून पळ काढला आहे. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षकाला ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगवीत गुरुवारी (दि. २) सापळा लावून ही कारवाई करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक हेमा सिध्दराम सोळुंके (वय २८) यांना ताब्यात घेतले असून सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक बाळकृष्ण देसाई पळून गेले आहेत. याप्रकरणी ४२ वर्षीय पुरुषाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके आणि सहायक उपनिरीक्षक बाळकृष्ण देसाई हे दोघेही सांगवी पोलीस ठाण्यात नियुक्त आहेत. तक्रारदार पुरुषाच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल आहे. त्या अर्जाची चौकशी उपनिरीक्षक सोळुंके करीत होत्या. अर्जावरून बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ व २६ नोव्हेंबर रोजी पडताळणी केली.
उपनिरीक्षक हेमा सोळुंके यांच्या सांगण्यावरून सहायक उपनिरीक्षक देसाई यांनी तक्रारदाराकडे एक लाखाची मागणी केली व तडजोडीअंती ७० हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार गुरुवारी (दि. २) सहायक उपनिरीक्षक देसाई यांनी तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाच स्वीकारली.
लाचेची रक्कम घेऊन पसार
तक्रारदाराकडून लाच स्वीकारण्यास उपनिरीक्षक सोळुंके यांनी सहमती दर्शवली. त्यानुसार सहायक पोलीस उपनिरीक्षक देसाई यांनी तक्रारदाराकडून ७० हजारांची लाच स्वीकारली. त्यावेळी सापळा लावलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक त्यांना पकडण्यासाठी गेले. त्यावेळी देसाई यांनी पथकाला धक्का दिला. त्यानंतर लाचेची रक्कम घेऊन त्यांच्या दुचाकीवरून ते पळून गेले.