पुण्यात ट्रकच्या धडकेत पोलीस उपनिरीक्षक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 09:37 AM2019-12-18T09:37:29+5:302019-12-18T09:39:35+5:30
सातारा रोडवरील बालाजीनगर येथील पुलावर भरधाव जाणाऱ्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून ट्रक दुभाजक ओलांडून समोर येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली.
पुणे : सातारा रोडवरील बालाजीनगर येथील पुलावर भरधाव जाणाऱ्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून ट्रक दुभाजक ओलांडून समोर येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे हे जखमी झाले. शिंदे हे गुन्हे शाखेच्या युनिट २ मध्ये नियुक्तीला आहेत. बालाजीनगर येथील बीआरटी मार्गावरील सदगुरु श्री शंकर महाराज उड्डाण पुलावर मंगळवारी रात्री ११ वाजता हा अपघात झाला.
ट्रक कात्रजकडून स्वारगेटकडे जात होता. तर नितीन शिंदे हे आपले काम संपवून आंबेगाव खुर्द येथील घरी जात होते. उड्डाणपुलावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रक (एमएच-०४-डीके-८८५१) दुभाजकावरुन विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेला. शिंदे हे कात्रजच्या दिशेने जात होते. ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे.
अपघातानंतर ते जागीच बेशुद्ध झाले होते. नागरिकांनी त्यांना तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारानंतर ते शुद्धीवर आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. डॅपरचालकही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. घटनास्थळी आलेले सहकारनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.