श्वेता रानवडे खूनप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक वैशाली सूळ निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 09:51 AM2022-11-22T09:51:09+5:302022-11-22T09:51:45+5:30
वैशाली सूळ असे निलंबित पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे...
पुणे : औंध येथील श्वेता रानवडे खूनप्रकरणी आरोपीविरोधात ठोस कारवाई न केल्याने संबंधित महिला पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित केले. तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक व आणखी एका पोलिस उपनिरीक्षकाची बदली करण्यात आली आहे. वैशाली सूळ असे निलंबित पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
प्रतीक ढमाले याने श्वेता रानवडे हिचा खून करून नंतर मुळशी येथे आत्महत्या केली होती. श्वेता हिने प्रतीकविरुद्ध तक्रार अर्ज दिला होता. त्याची चौकशी वैशाली सूळ यांच्याकडे दिली होती. या अर्जाची संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यावर ठोस कारवाई करणे आवश्यक होते. मात्र, तसे न केल्याने प्रतीक याने श्वेता हिचा खून केला. त्यामुळे वैशाली सूळ यांना निलंबित करण्याचा आदेश अपर पोलिस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी काढला आहे.
चतु:श्रुंगी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी पुढील आदेश होईपर्यंत पोलिस नियंत्रण कक्षात, तर पोलिस उपनिरीक्षक शामल पोवार/पाटील यांची विशेष शाखेत बदली केली आहे.