२६/११चा हल्ला अनुभवून प्रेरणा घेतलेला तरुण झाला पोलीस उपनिरीक्षक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 08:41 PM2019-03-09T20:41:00+5:302019-03-09T20:43:47+5:30
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून प्रेरणा घेत अविनाश किसनराव वाघमारे हा तरुण पोलीस उपनिरीक्षक झाला आहे.
पुणे : प्रेरणा ही ध्येयाच्या जवळ सर्वांत महत्वाची गोष्ट मानली जाते. एखाद्या प्रेरणेने झपाटलेल्या व्यक्तीने अशक्य गोष्टही शक्य करून दाखवल्याची उदाहरणे अनेकदा बघायला मिळतात. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून प्रेरणा घेत अविनाश किसनराव वाघमारे हा तरुण पोलीस उपनिरीक्षक झाला आहे.
भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचा कणा असलेल्या मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सुमारे १६६ निर्दोष व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले. त्यात हेमंत करकरे,अशोक कामठे, विजय साळसकर आणि तुकाराम ओंबळे या बहादूर पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र याच हल्ल्याच्या ठिकाणी हजार असलेल्या आणि सुदैवाने प्राण वाचलेल्या अविनाश यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याला, कर्तृत्वाला प्रेरणा मनात ११ वर्षांनंतर पोलीस उपनिरीक्षकपदाचे स्वप्न पूर्ण केले आहे.
अविनाश हे पुणे जिल्यातील खेड तालुक्यातील रहिवासी. सरकारी नोकरीत असलेल्या वडिलांपासून प्रेरणा घेत त्यांनी आपले स्वप्न साकार केली आहे. एमबीए झालेल्या अविनाश यांचे चांगल्या पगाराच्या नोकरीत मन रमत नव्हते. अखेर रामराम ठोकत कष्टाने त्यांनी ध्येयपूर्ती केली आहे. याबाबत ते सांगतात, 'मी एका नातेवाईकाला भेटायला मुंबईला गेलो होतो. त्यावेळी मला मुंबईत फारशी माहिती नसल्याने संबंधित नातेवाईकाने मला सी.एस. टी. स्टेशनला यायला सांगितले. त्यावेळी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक गोळीबाराचे आवाज येण्यास सुरुवात झाली आणि मी इतर लोकांच्या सांगण्याप्रमाणे पळतच स्टेशनच्या बाहेर पडलो. बाहेर आल्यावर काही वेळाने दहशतवादी हल्ला झाल्याचे समजले. त्यावेळी दैव बलवत्तर म्हणून वाचल्याची जाणीव झाली. या दरम्यान पोलिसांनी दाखवलेल्या अलौकिक शौर्याचा माझ्यावर मोठा परिणाम झाला आणि मी पोलीस खाते हेच माझे ध्येय म्हणून निश्चित केली. त्यादृष्टीने पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखतीची तयारी केली आणि उत्तीर्ण झालो.