नाकाबंदी मोडून जाणाऱ्या कारला रोखण्यासाठी पोलिसांचा थरारक पाठलाग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 08:07 PM2019-04-22T20:07:19+5:302019-04-22T20:08:35+5:30
निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा अनुुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस उपाययोजना करत आहेत.
बारामती : शहर पोलिसांनी केलेली नाकाबंदी मोडून जाणाऱ्या भरधाव कारला पोलिसांनी थरारक पाठलाग करून रोखले. या वेळी कारमध्ये तलवारीसह पिस्तुल घेऊन जाणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये पोलिसांनी कारसह ५ लाख ६४ हजारांचा माल जप्त केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा अनुुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस उपाययोजना करत आहेत. २० एप्रिल रोजी बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. बारामती शहरातून निळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून अग्निशस्त्राची वाहतूक होत आहे. ही कार इंदापूरकडे जाणार आहे, अशी खात्रीशीर बातमी त्यांना मिळाली होती. त्यावर पाटील यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक सतीश आस्वर व पोलीस कर्मचाऱ्यांना बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदापूर रस्त्यावर नाकाबंदी करण्याची सूचना केली. तसेच, संबंधित वाहन आल्यानंतर त्याची तपासणी करण्याचे आदेश दिला. त्याप्रमाणे लिमटेक (ता. बारामती) येथे नाकाबंदी लावून वाहन तपासणी सुरू असताना बारामती बाजूने एक निळ्या रंगाची स्विफ्ट कार येताना पोलिसांना दिसली.
नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी हे वाहन थांबविण्याचा इशारा केला. मात्र, कारचालकाने पोलिसांना जुमानले नाही. तो कार न थांबता नाकाबंदी तोडून भरधाव इंदापूरचे दिशेने निघाला. पोलीस उपनिरीक्षक आस्वर व पोलीस कर्मचाऱ्यांनी खासगी वाहनाने कारचा पाठलाग केला. ती मौजे खोरोची (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे थांबविली. मात्र, कारचा चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. त्या कारमधील इसमांना ताब्यात घेऊन पोलिसांनी तिची तपासणी केली. या वेळी कारमध्ये एक पिस्तुल (अग्निशस्त्र) व एक लोखंडी तलवार मिळून आली. या ठिकाणाहून एक तलवार, एक पिस्तुल आणि कार व दोन मोबाईल, असा एकूण ५ लाख ६४ हजार रुपयांचा माल जप्त केला. कारमधील राजेंद्र रामचंद्र सल्ले (वय ४६, रा .खोरोची, ता. इंदापूर, जि. पुणे), मनोहर पोपट काळभोर (वय ३०, रा. देशमुखवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पष्णू राजेंद्र सल्ले (रा. खोरोची, ता. इंदापूर जि. पुणे) हा फरारी आहे. त्याच्यावर इंदापूर व वालचंदनगर पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अजित राऊत यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये फिर्याद दिली आहे. सहायक फौजदार संदिपान माळी तपास करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सतीश आस्वर, सहायक फौजदार संदिपान माळी, पोलीस नाईक रमेश केकाण, दादासाहेब डोईफोडे, पोलीस कॉन्स्टेबल रूपेश साळुके, तुषार चव्हाण, अजित राऊत, तुषार सानप, नूतनकुमार जाधव, पोपट नाळे, सिद्धेश पाटील यांनी केली.