पानटपऱ्यांवर पोलिसांचे सर्जिकल स्ट्राइक; पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतर तासाभरात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:27 IST2025-01-30T13:27:02+5:302025-01-30T13:27:54+5:30
- हडपसर, काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टपऱ्या तोडल्या

पानटपऱ्यांवर पोलिसांचे सर्जिकल स्ट्राइक; पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतर तासाभरात कारवाई
पुणे : हडपसर, काळेपडळ परिसरातील शाळांच्या १०० मीटर परिसरात अवैध पद्धतीने पानटपऱ्या सुरू असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली. हडपसर परिसरात बुधवारी (दि. २९) सकाळी झालेल्या कार्यक्रमादरम्यान नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकल्यानंतर पोलिस आयुक्तांनी स्टेजवरूनच सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले यांना कार्यक्रम संपताच सदर टपऱ्या उचला, असे आदेश दिले. त्यानुसार कार्यक्रमानंतर तासाभरातच या परिसरातील टपऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरातील शाळांच्या १०० मीटर परिसरात असलेल्या टपऱ्या पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत. त्यांच्यावरही थेट कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास कायद्याने बंदी आहे. मगरपट्टाच्या मागील बाजूस कडवस्ती परिसरात असलेल्या शाळेच्या आवारातील तीन पानटपरी चालकांवर कोफ्ता कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. ही कारवाई हडपसर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी अनुराधा उदमले यांच्या उपस्थितीत झाली. काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोहम्मदवाडी परिसरातील रहेजा विस्टा येथील टपऱ्यांवरही धडक कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले. शाळा परिसरात अशा टपऱ्या सुरू करून तेथे तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.