वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन देणारा पोलीस हवालदार बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 08:14 PM2020-03-19T20:14:25+5:302020-03-19T20:16:10+5:30
वेश्याव्यवसायात ढकललेल्या तरुणीला मदत करण्याऐवजी आरोपींना मदत करून वेश्याव्यवसायास प्रोत्साहन
पुणे : एका २३ वर्षांच्या बांगलादेशी तरुणीला वेश्याव्यवसायात आणणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी आरोपींना मदत केल्याबद्दल पोलीस हवालदार हनुमंत महादेव वणवे याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती अशी : बांगलादेशी तरुणीला वेश्याव्यवसायात लावून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतल्याप्रकरणी एक कुंटणखानाचालिका व घरमालक गणेश भोसले यांना फरासखाना पोलिसांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी कारवाई करून अटक केली होती. कुंटणखानाचालिकेचा मोबाईल तपासल्यावर पोलीस हवालदार हनुमंत वणवे याचे कुंटणखाना चालिकेबरोबर अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्न झाले होते. बुधवार पेठेतील भगत बिल्डिंगमधील फ्लॅट आरोपी कुंटणखानाचालिका व गणेश भोसले यांच्या नावावर होता. प्रत्यक्षात त्यासाठी हनुमंत वणवे याच्या पैशाने खरेदी करण्यात आला होता. फ्लॅटखरेदीच्या दस्तऐवजावर साक्षीदार म्हणून वणवे याची सही आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात वणवे नेमणुकीला असल्याने पोलिसांनी काही मोहीम आखली तरी ती अगोदर त्यांच्यापर्यंत पोहोचत असत. हवालदार हनुमंत वणवे याने वेश्याव्यवसायात ढकललेल्या तरुणीला मदत करण्याऐवजी आरोपींना मदत करून वेश्याव्यवसायास प्रोत्साहन देऊन गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य केल्याचे पोलीस चौकशीत दिसून आले. त्यामुळे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी चौकशीअंती हवालदार हनुमंत वणवे याला पोलीस खात्यातून बडतर्फ केले आहे.