शुभम कामठे टोळीवर पोलिसांची मोक्का अंतर्गत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:10 AM2021-04-04T04:10:06+5:302021-04-04T04:10:06+5:30
लोणी काळभोर : कदमवाकवस्ती, हडपसरसह पूर्व हवेलीत एका संघटनेच्या नावाखाली गेले काही वर्षांपासून दादागिरी करणाऱ्या शुभम कामठेसह त्याच्या टोळीवर ...
लोणी काळभोर : कदमवाकवस्ती, हडपसरसह पूर्व हवेलीत एका संघटनेच्या नावाखाली गेले काही वर्षांपासून दादागिरी करणाऱ्या शुभम कामठेसह त्याच्या टोळीवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा शहर पोलीस दलांत समाविष्ट होऊन अवघा बारा दिवसांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच कामठेसह त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करुन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आता तुमची खैर नाही, असा इशारा दिला आहे.
शहर पोलिसांनी कामठे टोळीतील दत्ता भीमराव भंडारी (वय २४, रा. पापडेवस्ती, हडपसर, ता. हवेली), सौरभ विठ्ठल घोलप (वय २२, रा. काळेपडळ, हडपसर), हृतिक विलास चौधरी (वय २१), साहिल फकिरा शेख (वय २१) या चार जणांना अटक केली आहे. यांचेवर मोक्का अंतर्गत कारवाई होणार असल्याचे कळताच कामठे व त्याचे तीन सहकारी फऱार झाले आहेत.
कामठे टोळीबरोबरच सोशल मीडियावर स्वतःला डॉन म्हणवुन घेणाऱा कदमवाकवस्ती येथील एक स्वयंघोषीत दादा व त्याची टोळीही शहर पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी सदर डॉन व त्याच्या सहका-यांवर मोक्का अंतर्गत कारवाईसाठीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला असल्याची माहितीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. कामठे व त्याच्या टोळीवर लोणी काळभोर व हडपसर पोलीस ठाण्याचे हद्दीत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र लोणी काळभोर पोलिसांनी या टोळीकडे दुर्लक्ष केले होते. परंतू कांही दिवसापूर्वी कामठे व त्याच्या सहकाऱ्यांनी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एटीएम केंद्रात एका तरुणावर कोयत्याने वार केले होते. हा तरुण या घटनेत बचावला परंतु मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यामुळे लोकांमध्ये दहशत पसरली होती. या टोळीवर कायमस्वरुपी जरब बसावी यासाठी हडपसर पोलिसांनी उपायुक्त नम्रता पाटील यांच्या माध्यमातून या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, असा प्रस्ताव अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे सादर केला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या कडे हा प्रस्ताव गेल्यावर त्यांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
यापुढील काळातही गुन्हेगारांच्यावर कारवाया सुरूच राहतील, अशी माहिती उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील सोशल मीडियावर स्वतःला डॉन म्हणवुन एक स्वयंघोषीत दादा तसेच सोन्या व त्याची टोळी गेले चार ते पाच वर्षांपासून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घालत आहे. परंतू राजकीय हस्तक्षेपामुळे या टोळीवर अद्याप लोणी काळभोर पोलीसांनी योग्य ती कारवाई केली नव्हती. मात्र शहर पोलिसांनी या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. येत्या आठवड्यात या प्रस्तावाला ही पोलीस आयुक्तांची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणात आणता येईल, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला आहे. या टोळीवर एका अट्टल गुन्हेगाराचा खून केल्याचा गुन्हा दाखल असून या सारखे अनेक गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत.