पोलिसांच्या बदल्या होणार अधिक पारदर्शी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:12 AM2021-05-26T04:12:34+5:302021-05-26T04:12:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहर पोलीस दलातील अंतर्गत बदली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व सुसूत्रता यावी, यासाठी पुणे पोलीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहर पोलीस दलातील अंतर्गत बदली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व सुसूत्रता यावी, यासाठी पुणे पोलीस दलात आता सर्वसाधारण बदली पोलीस व्यवस्थापन प्रणाली (जीटीपीएमएस)या अॅपचा वापर करण्यात येणार आहे. यंदा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी या अॅपचा वापर करणार आहे. या प्रणालीत प्रत्येक कर्मचाऱ्याची पदनिहाय व कामानिहाय नोंदी होणार आहे. तसेच परिमंडळातील कोणत्या पोलीस ठाण्यात सहायक फौजदार, हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई यांची संख्या किती आहे, हे देखील बदलीच्या वेळी दिसणार आहे.
शहर पोलीस दलातील अंतर्गत बदल्या हा नेहमीच चर्चेचा विषय होत असतो. गेल्या वर्षी सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्तालयात बदली बदलून मिळावी, यासाठी विनंती अर्ज करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची मोठी रांग लागली होती. या बदल्यांमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली होती. त्यानुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांच्या पथकाने एका कंपनीमार्फत हे अॅप विकसित केले आहे.
नियमित वार्षिक बदल्यांसाठी पात्र असलेल्यांची माहिती परिमंडळाकडून भरुन घेण्यात आली आहे. पात्र असलेल्या पोलिसांनी यापूर्वी कोणत्या पोलीस ठाण्यात काम केले आहे. त्यांचे पद, त्यांच्या कामाच्या स्वरूपासह वैयक्तिक माहिती या अॅपमध्ये भरण्यात आली आहे.
या वर्षी कार्यकाळ पूर्ण झालेल्या १३०० पोलिसांच्या नियमित बदल्या होणार आहेत. तर साडेसातशे पोलिसांनी विनंती बदलीसाठी अर्ज केला आहे.
मनुष्यबळाचे होणार नियोजन
शहरातील अनेक पोलीस ठाण्यांच्या मंजुरीच्या वेळी जेवढे मनुष्यबळ होते, तेवढेच अजूनही मनुष्यबळ आहे. त्यातील अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. या अॅपमध्ये भरण्यात आलेल्या माहितीवरून पोलीस ठाण्यातील मनुष्यबळाची आवश्यकता समोर येणार आहे. त्यानुसार मनुष्यबळाचे नियोजन करण्यात येणार आहे.