तलवारीने केक कापणाऱ्या गुंडाचा पोलिसांनी केला पाहुणचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:10 AM2021-07-26T04:10:14+5:302021-07-26T04:10:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सराईत गुन्हेगार रोहन घोलप याने हातात तलवार घेऊन केक कापतानाचा व्हॉट्सअॅप ठेवल्याची माहिती मिळाल्यावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सराईत गुन्हेगार रोहन घोलप याने हातात तलवार घेऊन केक कापतानाचा व्हॉट्सअॅप ठेवल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या युनिट १च्या पथकाने त्याला पकडून पाहुणचार केला.
तलवार, कोयता, चाकू बनविणारे व शस्त्र जवळ बाळगणारे यांच्याविरोधात विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते.
पोलीस अंमलदार अजय थोरात यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार अखिल देशमुख याने हातात तलवार घेऊन केक कापतानाचे व्हॉटसॲपवर स्टेटस ठेवले आहे. तो तलवारीसह सूर्या हॉस्पिटलजवळ थांबला आहे. या माहितीवरुन पोलिसांनी तेथे जाऊन अखिल ऊर्फ गणेश विलास देशमुख (वय ३०, रा. कसबा पेठ) याला ताब्यात घेतले.
पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना माहिती मिळाली की, रोहन घोलप याने हातात तलवार घेऊन व्हॉटसॲपवर स्टेटस ठेवले आहे. तो तलवारीसह झेड ब्रिजवर थांबला आहे. या माहितीनुसार गुन्हे शाखेचे युनिट १ चे पथकाने तेथे जाऊन रोहन रमेश घोलप (वय २१, रा. गोखलेनगर) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिस अमलदार सचिन जाधव यांना मिळालेला माहिती नुसार रोहन घोलप याने हातात तलवार घेऊन वॉट्स ॲपवर स्टेटस ठेवले असून तो तलवार सह झेड ब्रिजवर डेक्कन पुणे येथे थांबला आहे त्यानुसार आम्ही युनिट 1 कडील अधिकारी व अमलदार सदर ठिकाणी जावून खात्री करून योग्य ती कारवाई करावी असे आदेश दिले त्यानुसार सदर ठिकाणी जावून सापळा रचून इसम नामे रोहन रमेश घोलप वय २१ रा. गोखले नगर पुणे यास ताब्यात घेतले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, सचिन जाधव, शशिकांत दरेकर, दत्ता सोनवणे, विजयसिंह वसावे, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांनी केली आहे.