पोलिसांकडून महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 11:50 PM2018-10-05T23:50:47+5:302018-10-05T23:50:59+5:30
कदमवाकवस्ती : पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कवडीपाट टोलनाक्याजवळ एक महिला दुचाकीवरून जात असताना, बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने संबंधित महिलेस आपल्या दुचाकीवर बसण्याची विनंती करीत विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कदमवाकवस्ती येथील एमआयटी शिक्षण संस्थेला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भेट दिली. यावेळी राज्यपालांच्या भेटीसाठी जिल्ह्यातून बंदोबस्त मागवण्यात आला होता. यापैकीच एक अठ्ठावन्नवर्षीय कनिष्ठ अधिकारी कवडीपाट टोलनाक्याजवळ बंदोबस्तासाठी उभे होते. साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक महिला दुचाकीवरून जात असताना, संबंधित अधिकाºयाने आपल्या दुचाकीचा हॉर्न तीन वेळा वाजवला. मात्र संबंधित महिलेने लक्ष न दिल्याने, चौथ्या वेळी या महिलेस हातवारे करून आपल्या दुचाकीवर बसण्याची विनंती केली. यावर घाबरलेल्या महिलेने घडलेल्या घटनेची माहिती फोनवरून पतीला सांगितली. पतीने तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेऊन, संबंधित अधिकाºयाच्या विरोधात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी पोलीस अधिकारी असल्याने, लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील एका कर्मचाºयाने महिलेच्या पतीला समजावून सांगून विनयभंगाऐवजी किरकोळ तक्रार दाखल करण्यास सांगितले. मात्र, पती विनयभंगाच्या तक्रारीवर ठाम असल्याचे लक्षात येताच, संबंधित अधिकाºयाने रडण्याचे नाटक करण्यास सुरुवात केली. त्यातच लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सर्वच वरिष्ठ अधिकारी बंदोबस्तात गुंतले असल्याची संधी साधत, लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील कर्मचाºयाने विनयभंगाच्या तक्रारीचे रुपांतर किरकोळ तक्रारीत करून घेतले.
याबाबत पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील म्हणाले, ‘‘राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह अनेक व्हीआयपी लोक एमआयटी शिक्षण संस्थेत असल्याने, दिवसभर बंदोबस्तात अडकलो असल्याने नेमके काय घडले याची माहिती नाही. पोलिसांनी एका कनिष्ठ अधिकाºयाच्याविरोधात किरकोळ तक्रार आल्याची माहिती दिली आहे. मात्र संबंधित अधिकाºयाने विनयभंग केला असेल, तर मात्र कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’’