रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या फार्मासिस्टला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 09:37 PM2021-04-22T21:37:00+5:302021-04-22T21:39:00+5:30
१० हजारांना विकत होता एक इंजेक्शन
पुणे : कोरोना बाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करुन चढ्या किंमतीला विकणार्या औषध विक्रेत्याला कोंढवापोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अंकित विनोद सोलंकी (वय २६, रा. सुखवानी कॉम्प्लेक्स, दापोडी) असे अटक केलेल्या विक्रेत्याचे नाव आहे.
कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीखक शब्बीर सय्यद यांना अंकीत सोलंकी हा कोंढव्यातील जायका हॉटेलजवळ रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सय्यद यांनी साध्या वेशामध्ये तपास पथकातील अधिकारी प्रभाकर कापुरे व पोलीस अंमलदार यांच्या पथकाला बनावट ग्राहक तयार करुन इंजेक्शन घेण्यास पाठविले. यावेळी सोलंकी याने अंमलदाराला जायका हॉटेलच्या बाजूला नेऊन त्यांना दोन इंजेक्शन दाखविले. एका इंजेक्शनसाठी १० हजार रुपयांची मागणी केली. तसेच एका इंजेक्शनसाठी १० हजार रुपये रोख स्वीकारले़ नंतर १० हजार रुपये ऑनलाईन स्वरुपात मागणी करत होते. त्याचवेळी पोलिसांनी छापा घालून त्याला पकडले. अधिक तपासासाठी त्याला १ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. त्याने आतापर्यंत १० ते १२ इंजेक्शन विकल्याची माहिती समोर येत आहे.
फार्मासिस्ट करतोय पोलिसांची दिशाभूल अंकित सोलंकी हा कोंढव्यातील एका हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट म्हणून कामाला आहे. या हॉस्पिटलमध्ये येणार्या कोविड रुग्णांचे नातेवाईक चौकशी करत. तेव्हा तो त्यांची माहिती घेऊन त्यांच्याशी नंतर संपर्क करत असे. अगोदर त्याने आपण प्रिस्कीप्शन चोरुन त्याद्वारे ससून हॉस्पिटलमधून इंजेक्शन खरेदी केल्याचे सांगितले. मात्र, चौकशीत ही माहिती खोटी निघाली. त्यानंतर त्याने आपण रुग्णाची राहिलेली इंजेक्शन चोरुन ती विकत असल्याचे सांगितले. आता एक माणूस ही इंजेक्शन आणून देत असल्याचे सांगतो आहे. पोलिसांची तो दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असून कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.