धार्मिक स्थळी ज्येष्ठ महिलांना प्रसादाच्या पेढ्यातून गुंगीचे औषध देत लुटणाऱ्या 'पिंकी'ला पोलिसांच्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 09:43 PM2021-07-17T21:43:43+5:302021-07-17T21:45:40+5:30
विविध राज्यातील धार्मिक स्थळावर पिंकीने चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर
पुणे : धार्मिक स्थळावर आलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलांना प्रसादातील पेढ्यात गुंगीचे औषध खायला देऊन लुटणाऱ्या पिंकी परियाल या महिलेला फरासखाना पोलिसांनी अटक केली. ती मुळची झारखंडच्या जमजेशदपूरची रहिवासी असल्याचे कळते. तिच्याकडून गुंगीचे औषध व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवार पेठेतील एका ७२ वर्षाच्या महिलेला २५ जून रोजी बुधवार पेठेतील मोबाईल मार्केटमध्ये पिंकी भेटली. तिने या महिलेला दरमहा २ हजार रुपये मिळवून देते, असे सांगून रिक्षातून स्वारगेटला नेले. तेथे तिने गुंगीचे औषध मिसळलेला प्रसाद खाण्यास दिला. या महिलेला गुंगी आल्यावर तिच्याकडील रोकड व अडीच तोळ्याचे दागिने चोरुन नेले होते.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार अभिनय चौधरी व सयाजी चव्हाण यांना ही संशयित महिलापुणे स्टेशन परिसरातील लॉजमध्ये जाताना दिसली. लॉजच्या रजिस्टरची पाहणी केली असता तिचे नाव पिंकी परीयाल असल्याचे समजले. पोलिसांनी तिच्यावर नजर ठेवली होती. चोरीसाठी पिंकी परत स्टेशन परिसरातील लॉजवर येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या सुचनेनुसार, सहायक पोलिस निरीक्षक मनोज अभंग याच्या पथकाने सापळा रचून पिंकीला ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणून तिची सखोल चौकशी केली असता तिने विविध ठिकाणी अशा चोऱ्या केल्याचे सांगितले.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे निरीक्षक तटकरे, कर्मचारी रिजवान जिनेडी, सचिन सरपाले, आकाश वाल्मिकी, अमोर सरडे यांच्या पथकाने केली.
अनेक ठिकाणी केल्या चोऱ्या
पिंकी परियालने शिर्डी परिसरात देखील महिलांचे दागिने चोरले होते. वेगवेगळ्या राज्यातील धार्मिक स्थळावर तिने अशाच प्रकारे चोरी केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. धार्मिक स्थळी येणाऱ्या जेष्ठ महिलांना ती अगोदर हेरायची. त्यानंतर प्रसादाच्या पेढ्यातून झोपेच्या गोळ्याची पावडर मिसळून खाऊ घालत असे. एकदा का महिला बेशुद्ध झाली की तिच्या अंगावरील दागिने व ऐवज चोरी करून ती पळ काढायची अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिली.