कुख्यात गुंड गजानन मारणेच्या रॅलीतील दोन फरारी गुंडांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 10:38 PM2021-06-22T22:38:00+5:302021-06-22T22:38:24+5:30
हडपसर, लोणी काळभोरमधून घेतले ताब्यात, दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाची कामगिरी
पुणे : कुख्यात गुंड गजानन मारणे याची तळोजा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर रॅली काढून दहशत पसरविण्यात सहभागी असलेल्या दोघा फरार गुंडांना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने पकडले.
ऋषिकेश ऊर्फ ऋषा अनिल सोनवणे (वय २४, रा. मांजरी, हडपसर) आणि फिरोज ऊर्फ मुन्ना दिलदार पठाण (वय ३७, रा. इंदिरानगर, लोणी काळभोर) अशी दोघांची नावे आहेत.
गजानन मारणे यांची मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरुन रॅली काढण्यात आली होती. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या रॅलीत सहभागी असलेला फरार ऋषिकेश सोनवणे हा हडपसर येथील रुचिता हॉटेल येथे आला असल्याची माहिती पोलीस नाईक मनोज खरपुडे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप व सहकार्यांनी तेथे जाऊन सोनवणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर मुन्ना पठाण हाही सोबत असल्याची माहिती त्याने दिली. त्यानुसार लोणी रेल्वे स्टेशनजवळ पोलिसांनी सापळा रचून मुन्ना पठाण याला पकडण्यात आले.
त्यांच्यावर लोणी काळभोर, वानवडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन तर पाचगणी पोलीस ठाण्यात मारामारीचा एक गुन्हा दाखल आहे. अधिक तपासासाठी दोघांना तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.