पोलीस असल्याचं भासवून एसटी प्रवाशांचे सव्वा कोटी रुपये लुटणाऱ्यांना पोलिसांनी ७२ तासांमध्ये ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 05:49 PM2021-08-06T17:49:32+5:302021-08-06T17:55:50+5:30
स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणने दरोड्याचा गुन्हा 72 तासात केला उघड
पुणे : पोलीस असल्याची बतावणी करीत पास असलेल्या एसटीमधील कुरिअर सर्व्हिस करणाऱ्या चौघांना हेरून त्यांना मारहाण व शिवीगाळ करत १ कोटी ५५ लाखांची रक्कम लुटलेल्या आरोपींच्या मुसक्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ७२ तासात आवळल्या. त्यांच्याकडून १ कोटी ५४ हजार ५४० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कुरिअर कंपनीचे कर्मचारी एसटीमधून प्रवास करीत आहेत. याची माहिती देणारे कंपनीमधील कुणीतरी सहभागी असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
रामदास भाऊसाहेब भोसले (वय ३० रा.वरूडे ता.शिरूर पुणे ), तुषार बबन तांबे ( वय २२ रा.वरूडे, ता.शिरूर पुणे) आणि भरत शहाजी बांगर (वय ३६ रा.गणेगाव खालसा ता.शिरूर जि.पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लातूरहून मुंबईच्या दिशेने मंगळवारी (दि. ३) मध्यरात्रीच्या सुमारास चाललेल्या एसटी चालकाला पोलीस असल्याची बतावणी करून चौघांनी पाटस टोलनाक्याजवळ अडविले. त्यानंतर पासद्वारे प्रवास करणाठया फक्त चार प्रवाशांना बाहेर बोलावून घेत चोरट्यांनी एसटी चालकाला मार्गस्थ होण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी संबंधित प्रवाशांना आम्ही पोलीस आहोत, तुमच्याकडील ऐवज चोरीचा असल्याचे सांगून १ कोटी १२ लाख ३७ हजारांचा काढून घेत मोटारीतून पळ काढला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडून तांत्रिक विश्लेषणासह सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम करण्यात येत होते. तपासात भोसले भावडांसह साथीदारांनी प्रवाशांची लुट केल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून आरोपी रामदास भोसले, तुषार तांबे, भरत बांगर यांना खराडी बायपास परिसरात ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ९२ लाख ८४ हजार ५४० रूपयांसह वापरण्यात आलेल्या गाड्या देखील जप्त करून १ कोटी ५४ हजार ५४० रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात यश आले. आरोपींनी रक्कम खर्च करण्याआधी त्यांच्याकडून गुन्ह्यातील १ कोटी ५५ हजारांचा ऐवज परत मिळविण्यात आल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, एपीआय सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, शब्बीर पठाण, राजू मोमीण, जर्नादन शेळके, अनिक काळे, रविराज कोकरे, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, विजय कांचन, गुरू जाधव, धीरज जाधव,बाळासाहेब खडके, दगडू विरकर, काशीनाथ राजापुरे यांनी केली.