चाेरट्यांना आळा घालण्यासाठी आता पीएमपी बसमध्ये असणार पाेलीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 05:05 PM2019-12-18T17:05:11+5:302019-12-18T17:06:51+5:30
पीएमपी बसमध्ये हाेणाऱ्या चाेऱ्यांना आळा घालण्यासाठी आता साध्या वेशातील पाेलीस पीएमपी बसमधून गस्त घालणार आहेत.
पुणे : पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यातच गर्दीच्यावेळी बसमध्ये चढताना, तसेच उतरताना प्रवाशांचा ऐवज लंपास करणारी टाेळी शहरात चांगलीच सक्रीय झाली आहे. गर्दीची बस स्थानके, एसटी स्थानके येथे चाेरटे प्रवाशांचा खिसा कापत आहेत. या चाेरट्यांना आळा घालण्यासाठी आता पाेलिसांकडून पाऊल उचलण्यात आले आहे. आता साध्या वेशातील पाेलीस पीएमपी बसेसमधून प्रवास करणार आहेत. या चाेरट्यांचा बंदाेबस्त करण्यासाठी गर्दीच्या बस थांब्यांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
प्रवाशांचा ऐवज चाेरटे लंपास करत असल्याच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये वाढ झाली आहे. गर्दीच्या बस स्थानकांमध्ये प्रवाशांच्या पैशावर, तसेच वस्तूंवर हे चाेरटे ड्ल्ला मारत आहेत. खासकरुन महिला व ज्येष्ठ नागरिकांना चाेरटे लक्ष करत आहेत. अनेकदा नागरिक या घटनांची तक्रार देत नाहीत. त्यामुळे चाेरट्यांचे चांगलेच फावते. गेल्या काही दिवसांपासून शहरातील महत्त्वाची स्थानके, तसेच रेल्वे स्टेशन परिसरात चाेरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे ज्या मार्गांवर चाेरीच्या घटना घडल्या आहेत, त्या मार्गांवरील बसमध्ये साध्या वेशातील पाेलीस गस्त घालणार आहेत.
याविषयी बाेलताना गुन्हे शाखेचे अतिरिक्त पाेलीस आयुक्त अशाेक माेराळे म्हणाले, पीएमपीमधील प्रवशांच्या वस्तू, पैसे चाेरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या चाेरट्यांना आळा घालण्यासाठी खास पथकांची नेमनूक करण्यात आली आहे. साध्या वेशातील पाेलीस पीएमपी बसमधून गस्त घालणार आहेत. शहरातील प्रमुख पीएमपी थांबे, स्थानके, एसटी स्थानकांच्या परिसरात गस्त घालण्याच्या सूचना गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.