पोलिसांसाठी खासगी गृहप्रकल्पात घरे मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 05:50 AM2018-04-11T05:50:22+5:302018-04-11T05:50:22+5:30
पोलिसांनाही हक्काचे घर मिळावे, यासाठी खासगी विकासकांच्या मदतीने स्वस्त दरात घरे उपलब्ध करून दिली जात आहेत.
टिटवाळा : पोलिसांनाही हक्काचे घर मिळावे, यासाठी खासगी विकासकांच्या मदतीने स्वस्त दरात घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांसाठी घरे तयार होत आहेत. या इमारतींच्या रेडीरेकनरचे दर कमी करण्यासंदर्भात किंवा नोंदणी शुल्क आणि स्टॅम ड्युटीमध्ये सवलत मिळावी, यासाठी मी मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार आहे. मात्र, त्यानंतरही दर कमी न झाल्यास पोलीस वेलफेअर फंडातून ही फरकाची रक्कम कर्जाच्या स्वरूपात दिली जाईल. कोणत्याही परिस्थितीत पोलिसांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार केले जाईल, असे आश्वासन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी टिटवाळानजीकच्या बल्याणी येथे घरांच्या भूमिपूजन कार्यक्र मात दिले.
पोलिसांसमोर हक्काच्या घरांचा प्रश्न आहे. मात्र, सातव्या वेतन आयोग येऊ घातला आहे. त्यामुळे काही प्रमाणात पोलिसांचे पगार वाढणार आहेत. अनेक वित्त संस्था पोलिसांना कर्जपुरवठा करण्यास तयार आहेत. त्यामुळे हक्काचे घर घेण्याची हीच वेळ आहे. म्हाडा आणि सिडकोनेही या योजनेतून पोलिसांना घरे देण्यासाठी सकारात्मकता दाखविली असल्याचे त्यांनी सांगितले.
>ठाणे जिल्ह्यातील बल्याण येथे ३३० घरे
ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीत टिटवाळाजवळील बल्याणी येथील गृहसंकुलातील १० मजली इमारतींमध्ये वन बीएचकेची २३०, तर टू बीएच केची १०० घरे तयार केली जाणार आहेत. त्यातील १६७ घरे पोलिसांनी घरे बुक केली आहेत. उर्वरित पोलिसांनाही घरे देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. बाजार भावापेक्षा ३५ टक्के कमी दराने ही घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. तर पाच जिल्ह्यांत ६६७ पोलिसांनी घरे बुक केली आहेत. २०१९ च्या शेवटी हक्काच्या घरांचा ताबा पोलिसांना मिळणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.