पोलिसाच्या पत्नीने 'खाकीवर्दी'लाच गंडवलं; बदला घेण्यासाठी सुनेला सोनसाखळी चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 10:31 PM2021-07-13T22:31:19+5:302021-07-13T22:33:04+5:30
वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात २२ जून रोजी एक साडे पाच तोळे सोनसाखळी (गंठण) चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सचिन सिंग -
वारजे : एखाद्या चित्रपटातल्या कथानकालाही लाजवेल अशी घटना वारजे माळवाडीत घडली आहे. सासू सुनेचे भांडण कुठल्या थराला जाईल याचा काही अंदाज भल्याभल्यांना लावता येत नाही. याचीच प्रचिती वारजे पोलिसांना एका सोनसाखळी चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करताना आली आहे. विशेष म्हणजे यात पोलिसांना चक्रावून टाकणारी उघडकीस आली असून गुन्हा दाखल करणारी महिला ही एका पोलिसाची बायको आहे.
वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात २२ जून रोजी एक साडे पाच तोळे सोनसाखळी (गंठण) चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार; फिर्यादी अलका दिलीप फडतरे (वय ६० रा. धायरी) या २२ तारखेला सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास वारजे स्मशानभूमी रस्त्यावरून नातेवाईकांकडे जात असताना मोटारसायकलवर दोघे जण आले. यात एक पुरुष व एक तरुण महिला होत्या. त्यांनी हिसका मारून गंठण पळवून नेल्याचे तक्रारीत सांगितले होते. या दोन लाखांच्या चोरी झाल्याचे दाखविण्यासाठी त्यांनी एक गौतम यादव नावाचा खोटा साक्षीदारही तयार केला व त्याने आपण दुरून ही घटना प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा पोलिसांना दिलेल्या जबाबात केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके व डीबी प्रमुख उपनिरीक्षक अशोक येवले यांना संबंधित महिलेने दिलेल्या दुचाकीच्या नंबरबाबत शंका आली. पोलिसांनी महिलेने सांगितलेल्या दुचाकी क्रमांकानुसार (एमएच ३७ यू २७९) संशयित वाहन चालक वैभव गाडे यास पिंपळे सौदागर येथून ताब्यात घेतले. पण त्या दिवशी व महिलेने सांगितलेल्या वेळी दुचाकीसह आपण पिंपळे सौदागर येथे आपल्या घरी असल्याची माहिती दिली.
या प्रकरणी अलका फडतरे या फिर्यादी असल्याचे कळताच त्याने पोलिसांना जो उलगडा केला. त्यावर पोलीस देखील चक्रावून गेले.
फिर्यादी यांचा लहान मुलगा अमोल व त्यांची सून अनामिका (नाव बदलले आहे) यांचे लग्न ४ वर्षांपूर्वी २०१७ मध्ये झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांनीच पती पत्नीत बेबनाव झाल्याने व भांडणे असह्य झाल्यावर अनामिका ही माहेरी निघून आली व तिने सासरच्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
व त्यांची कोर्टात घटस्फोट केस चालू आहे.
दरम्यान मेडिकल क्षेत्रातील अनामिका ही याच क्षेत्रातील त्याचा मित्र व गुन्ह्यातील तथाकथित दुचाकीस्वार आरोपी वैभव गाडे याच्या बरोबर फिरते व आपला घटस्फोट झाल्यावर दोघे लग्न करणार असल्याची कुणकुण अलका व तिचा मुलगा अमोल याला लागली. म्हणून तिचे चांगले होऊ नये या उद्देशाने त्यांनी साखळी चोरीचा खोटा गुन्हा दाखल करून वैभव व अनामिका यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या सतर्कतेने त्यांची खेळी उलटी पडली आहे.
पती पोलीस सेवेत...
विशेष म्हणजे अलका यांचे पती पोलीस सेवेत होते व प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांनी नुकतीच सक्तीची निवृत्ती घेतली आहे. या प्रकरणी त्या तथाकथित साक्षीदार यादव यास न्यायालयात हजर करून न्यायालयाचा संमतीने पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.