लुटारूंच्या टोळीत पोलीस शिपाईही, पिस्तुलाच्या धाकाने लुटणाऱ्या चौैघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 02:42 AM2018-04-07T02:42:13+5:302018-04-07T02:42:13+5:30
चौफुला (ता. दौंड) येथे चार महिन्यांपूर्वी दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून ५० हजार रुपयांची रोकड व दोन मोबाईल लुटणा-या चार आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले आहे.
यवत - चौफुला (ता. दौंड) येथे चार महिन्यांपूर्वी दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून ५० हजार रुपयांची रोकड व दोन मोबाईल लुटणा-या चार आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले आहे. या गुन्ह्यात एकूण सहा आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले होते. एक आरोपी अहमदनगर पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
चौफुला (ता. दौंड) येथे पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या मंथन स्पन पाईप दुकानामध्ये ४ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास पाईप घेण्याचा बहाणा करून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी दुकानमालकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवला. दुकानाच्या गल्ल्यातील व खिशातील ५० हजार रुपये रोख रक्कम व दोन मोबाईल लुटून नेल्याची घटना घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने चोरीला गेलेल्या मोबाईलच्या दिशेने तपास केला असता या गुन्ह्यात एकूण सहा आरोपींचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. यातील अल्ताफ चाँदसाहब पठाण (वय २१, रा. मुळानगर, ता. राहुरी, जि. नगर), आदित्य सुभाष बेल्हेकर (वय २४, रा. डिग्रस, ता. राहुरी), महेश अंकुश खोरे (वय २६, रा. गार, ता. श्रीगोंदा, जि. नगर), विकास सुरेश अडागळे (वय २८, रा. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे) अशी या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी आदित्य बेल्हेकर अहमदनगर पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून क्युआरटीमध्ये कार्यरत आहे.
गुन्ह्यातील दोन आरोपी मात्र अद्याप फरारी आहेत. अटक केलेल्या चार आरोपींना गुरुवारी दौंड येथील न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने (दि. ९) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी घनश्याम शिवराम भापकर (वय २८, रा. वाखारी, ता. दौंड, जि. पुणे) यांनी यापूर्वीच यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत असताना चोरीला गेलेले मोबाईल आरोपी महेश खोरे याच्याकडे असल्याचे तपासात उघड झाले होते. यानंतर आरोपी खोरेकडे अधिक चौकशी केली असता एकूण सहा आरोपींचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चौफुला येथे पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाºयाला लुटल्याच्या चार महिन्यांपूर्वीच्या घटनेचा लागला तपास
चार महिन्यांनंतर चार आरोपींच्या आवळल्या मुसक्या
कटात एकूण सहा आरोपींचा सहभाग, दोन आरोपी फरारी