नशीब बलवत्तर म्हणून वाचले : जखमींना वाचवणारे पोलिसच झाले जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 06:19 PM2018-07-19T18:19:16+5:302018-07-19T18:19:27+5:30
अचानक झालेल्या घटनेत आधीच्या अपघातग्रस्तांना आणि सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याच्या गडबडीत वाहनचालक आणि त्याच्या साथीदारांना पळून जाण्यात यश आले आहे.
पुणे : अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनाला ठोकर देत अज्ञात कारचालक निघून गेल्याची घटना पुण्यात घडली आहे. अचानक झालेल्या घटनेत आधीच्या अपघातग्रस्तांना आणि सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याच्या गडबडीत वाहनचालक आणि त्याच्या साथीदारांना पळून जाण्यात यश आले आहे. या संदर्भात पोलीस हवालदार एम बी पशाले यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत घडलेली घटना अशी की, दूध व्यावसायिकांच्या संपामुळे बावधन पोलीस चौकीतील कर्मचारी साहाय्यक पोलिस निरीक्षक पगारे, पोलीस हवालदार शिंदे, पशाले आणि पाटील यांच्यासह खबरदारी म्हणून गस्त घालत होते. त्यावेळी चांदणी चौकापासून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ते असताना त्यांना बावधन पुलावर पडलेली मोडेप आणि बाजूला दोन जखमी व्यक्ती दिसल्या. त्यांना मदत करण्यासाठी उतरत असताना त्यांनी आपले वाहन कडेला घेण्यास सुरुवात केली. मात्र इतक्यात भरधाव वेगाने येत एका कारने त्यांच्या जीपला मागच्या बाजूने जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की संबंधित कारचा जागेवर चक्काचूर झाला होता.
या अपघातात एअर बॅग असल्याने कारमधील कोणीही जखमी झाले नाहीत.मात्र पोलिसांपैकी तिघांना किरकोळ दुखापत झाली तर हवालदार शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी अचानक झालेल्या आणि आधीच्या अपघातातील जखमींना वाचवण्याच्या प्रयत्नात कारमधील चारही व्यक्तींनी संधीचा फायदा घेत पळ काढला. हे चौघेही जण गाडीत अपघातसमयी जीपमध्ये असल्यामुळे वाचले असून बाहेर असते तर भीषण घटना घडण्याची शक्यता होती असा अंदाज वर्तवण्यात येतो. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक पगारे यांनी बोलताना सांगितले की, धडक अत्यंत जोरात होती. त्यामुळे आमच्या गाडीचे एक टायर फुटले तर कारचे मोठे नुकसान झाले. मात्र जखमींना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असल्याने कार चालकांना घटनास्थळावरून निघून जाण्यात यश आले.